Unique Village : आता, नुकतेच सरकारने दुर्गम भागात डीडी सेटअप बाॅक्स फ्री देणार असल्याची घोषणा केली आहे. पण महाराष्ट्रातील या गावात टी.व्ही असून ही लोक सात वाजल्यानंतर बंद करतात. हे गाव कोणते आहे तसेच या मागचे कारण काय आहे, हे थोडक्यात जाणून घेऊयात.
गावाचे नाव
महाराष्ट्रातील सांगली जिल्हयातील ‘वडगाव’ असे या गावाचे नाव आहे. या गावात रोज संध्याकाळी सात वाजता सायरन वाजतो. या गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. गावातील बहुतांश लोक शेती व्यवसायात किंवा साखर कारखान्यात काम करतात.
गावकरी काय म्हणतात
या गावातील विजय मोहिते एका मुलाखतीत सांगतात “आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी 14 ऑगस्ट रोजी हा निर्णय घेतला आहे. या गावात रोज संध्याकाळी सात वाजता सायरन वाजतो. हा सायरनचा आवाज गावकऱ्यांना त्यांचे मोबाईल आणि टीव्ही सेट बंद करण्याचा संकेत म्हणजेच इशारा असतो. दीड तासानंतर म्हणजे साडेआठ वाजता पुन्हा पंचायतीचा सायरन वाजतो. गावातील लोक आपले मोबाईल आणि टी.व्ही पुन्हा सुरू करतात.”
का घेतला निर्णय
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मोबाईल व टी.व्ही चे व्यसन खूप घातक आहे. कोविडमध्ये शाळकरी मुलांचे हातात मोबाईल आले. त्यांचे आॅनलाइन क्लासमुळे त्यांच्या हाताला मोबाईलची सवय झाली आहे. आता अभ्यासाव्यतिरिक्त ही या मुलांच्या हातात मोबाईल दिसतो. तसेच हल्ली लोक एकमेकांतील संवाद हरवत चालली आहे. आस-पास लोक असतील तरी माणसे मोबाईलमध्ये गुंग असतात. त्यांना एकमेकांकडे पाहणे, चर्चा करणे ही जड जाते. यावर उपाय म्हणून सातनंतर मोबाईल बंद हा नियम संपूर्ण गावाला लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महिलवर्ग संध्याकाळची वेळी झाली, तर आपला वेळ मालिका बघण्यात घालवितात. त्यांच्या या वेळेचा सदुपयोगासाठी टी.व्हीदेखील बंद करून महिलांनी आपला वेळ चांगल्या कामात लावावा, त्यामुळे टी.व्हीबाबत देखील हा निर्णय घेण्यात आला आहे.