अनेकदा आपल्या पैशांची खूपच गरज असते, मात्र कुठूनच मदत मिळत नाही. कर्जासाठी प्रयत्न करूनही ते देखील मिळत नाही, अशा अडचणीच्या वेळी विमा पॉलिसी तुमच्या उपयोगी येऊ शकते. बहुतांश जणांना विमा पॉलिसीवर कर्ज मिळते हे माहित नसते. मात्र, पैशांची गरज असल्यास कर्जासाठी विमा पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. एलआयसीच्या पॉलिसीवर कशाप्रकारे कर्ज काढू शकता? यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासते? याबाबत नियम व अटी काय आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
LIC पॉलिसीवर किती मिळेल कर्ज?
सर्वात प्रथम लक्षात घ्या की, एलआयसीच्या सर्व पॉलिसीवर कर्ज मिळत नाही. टर्म इंश्योरन्स पॉलिसीवर कर्जाची सुविधा उपलब्ध नाही. सध्या एलआयसीद्वारे जीवन प्रगती, जीवन लाभ, सिंगल-प्रीमियम इंडोवमेंट प्लॅन, जीवन रक्षक, जीवन लक्ष्य सारख्या पॉलिसीवर कर्ज दिले जाते.
एलआयसी पॉलिसी ही कर्ज देताना तारण म्हणून ठेवली जाते. त्यामुळे कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवरून ठरत असते. सरेंडर व्हॅल्यू ही पॉलिसीधारकाने आतापर्यंत भरलेली रक्कम असते. अशाप्रकारे, सरेंडर व्हॅल्यूच्या 80 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते.
कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- कर्जासाठी अर्ज
- मूळ पॉलिसी प्रमाणपत्र
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- रहिवासी पुरावा
- उत्पन्न पुरावा म्हणून बँक अकाउंट स्टेटमेंट, सॅलरी स्लीप
एलआयसी पॉलिसीवर कर्जासाठी असा करा अर्ज
- तुम्ही एलआयसी पॉलिसीवर कर्ज काढण्यासासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला licindia.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाइटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या ऑनलाइन सर्व्हिस पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘Online Loan’ पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला लोन रिपेमेंट आणि ऑनलाइन लोन रिक्वेस्ट हे पर्याय दिसतील.
- कर्जासाठी Online Loan Request वर क्लिक करा. तुम्ही कस्टमर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करू शकता.
- तसेच, तुम्हाला कर्जाची रक्कम ज्या बँक खात्यात जमा करायची आहे, त्याची माहिती द्यावी लागेल. इतर माहिती भरून तुम्ही पॉलिसीवर आधारित कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला जवळील एलआयसी ऑफिसला भेट देऊन कागदपत्रांसह कर्जासाठीचा अर्ज भरून द्यावा लागेल.
कर्जावरील व्याजदर
एलआयसी पॉलिसीवरील व्याजदर हा 9 ते 12 टक्क्यांपर्यंत असतो. कर्जाची परतफेड करण्यासाठी ठराविक रक्कमेचा हफ्ता निश्चित करू शकता. एलआयसी पॉलिसीवरील कर्जाचा कालावधी हा सर्वसामान्यपणे 6 महिने असतो. तसेच, पॉलिसीनुसार देखील व्याजदर व हफ्त्यांचा कालावधी ठरतो.
एलआयी पॉलिसीवर कर्ज काढण्यासाठीचे नियम व अटी
- अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराकडे एलआयसी पॉलिसी असावी.
- मागील 3 वर्ष न चुकता एलआयसी प्रीमियम भरलेला असणे गरजेचे आहे.
- एलआयसी पर्सनल लोनचा कालावधी हा कमीत कमी 6 महिने असतो.
- पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास व्याज त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत आकारले जाते.
- पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यास मॅच्यूरिटी रक्कमेचा वापर कर्जाची रक्कम फेडण्यासाठी केला जाऊ शकतो.