निवृत्तीनंतरचा काळ हा आर्थिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक असतो. तुम्ही जर नोकरी करत असतानाच गुंतवणूक केलेली नसल्यास तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वृद्धापकाळात कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून नोकरी करत असतानाच पेन्शन व आरोग्य विम्यात गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
एखाद्या व्यक्तीचा निवृत्तीनंतरचा सर्वाधिक खर्च हा आरोग्य सेवेवर होतो. त्यामुळे योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करून आरोग्य विमा खरेदी करणे आवश्यक आहे. या लेखातून निवृत्तीनंतर हॉस्पिटल खर्चाचे कशाप्रकारे व्यवस्थापन करू शकता व ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या विमा पॉलिसी आहेत, याविषयी जाणून घेऊया.
तरूण असतानाच खरेदी करा विमा
वयाची 50-55 वर्ष पूर्ण केल्यानंतर आरोग्य विमा खरेदी करण्याऐवजी कमी वयात खरेदी करणे कधीही फायद्याचे आहे. कमी वय असताना विमा पॉलिसीसाठी तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागतो. क्लेम बोनसचाही फायदा मिळतो. तसेच, तुमच्याकडे विविध विमा पॉलिसींचा पर्याय उपलब्ध असतो.
प्रीमियमची रक्कम | कमी वयात आरोग्य विमा खरेदी केल्यास प्रीमियमची रक्कम देखील कमी भरावी लागते. समजा, तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 5 लाख रुपये कव्हरेज असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीसाठी 10 हजार रुपये खर्च केले आहेत. मात्र, तुमचे वय 40 वर्ष असल्यास याच विमा पॉलिसीसाठी तुम्हाला 20 हजार रुपये खर्च करावे लागतील. 60-65 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही रक्कम यापेक्षा अधिक असते. थोडक्यात, जास्त वय असलेल्या व्यक्तीच्या विमा पॉलिसीच्या प्रीमियमची रक्कमही जास्त असते. |
आरोग्य तपासणी | कमी वयात विमा खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आरोग्य तपासणी करावी लागत नाही. अनेक कंपन्या विमा पॉलिसी जारी करताना 40-50 वर्षांपुढील व्यक्तींची आरोग्य तपासणी करतात. या तपासणीत आधीपासूनच एखादा आजार असल्याचे आढळल्यास त्याचा पॉलिसीमध्ये समावेश केला जात नाही अथवा प्रीमियम जास्त भरावा लागतो. |
आजारांचा समावेश | सर्वसाधारणपणे तरूण व्यक्तींना कोणतेही आजार नसतात. त्यामुळे पॉलिसी खरेदी केल्यानंतर कोणताही आजार झाल्यास संपूर्ण खर्च त्यातून पूर्ण करता येतो. परंतु, वाढत्या वयात अनेकांना आजारांनी ग्रासलेले असते. अशावेळी विमा कंपन्या त्या आजारांचा पॉलिसीमध्ये समावेश करत नाही. त्यामुळे पॉलिसीचा हवा तेवढा फायदा मिळत नाही व हॉस्पिटलचा खर्च स्वतःच्या खिश्यातूनच करावा लागतो. |
निवृत्तीनंतर आरोग्य सेवांवरील खर्च पूर्ण करण्यासाठी टिप्स
निवृत्तीनंतर बचत केलेली नसल्यास आरोग्य सेवांसाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे इतर आधीपासूनच आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. समजा, तुम्ही आरोग्य विमा घेतलेला नसल्यास इतर बचतीमधून हा खर्च पूर्ण करू शकता. या बचतीमधून विमा पॉलिसीही खरेदी करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागेल. याशिवाय, सरकारकडूनही विविध आरोग्य व विमा योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला चांगले उपचार मिळतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विमा पॉलिसी
वाढत्या वयासोबत येणारे आजार, मृत्यू अशा विविध कारणांमुळे विमा कंपन्या वृद्ध नागरिकांना विमा पॉलिसी देणे टाळतात. काही कंपन्याद्वारे 60 ते 80 वयाच्या नागरिकांसाठी विमा पॉलिसी जारी केली जाते, परंतु त्यामध्ये अनेक नियम व अटींचा समावेश असतो. आदित्य बिर्ला आरोग्य विमा, बजाज अलियान्झ, डिजीट आरोग्य विमा, कोटक लाइफ सारख्या कंपन्यांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा पॉलिसी जारी केली जाते.