सणांना सुरुवात झाली की शॉपिंग करणे, एकमेकांना भेटवस्तू देणे आलेच. खासकरून, दसरा, दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंदात सण साजरे केले जातात. सणासुदीच्या काळात तुम्ही देखील मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर गिफ्ट वाउचर एक चांगला पर्याय आहे. तुम्ही अगदी घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून गिफ्ट वाउचर खरेदी करू शकता.
विशेष म्हणजे गिफ्ट वाउचर हे केवळ वस्तू खरेदी करण्यासाठी नसतात, तर याचा वापर करून तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेऊ शकता, बाहेर फिरायला जाण्यासाठी प्रवासाची तिकिटे काढू शकता व ओटीटी-म्यूझिक प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील घेता येईल. तुम्ही इतरांना भेट म्हणून देण्यासाठी कशाप्रकारे ई-कॉमर्स गिफ्ट वाउचर खरेदी करू शकता? व खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे? याबाबत या लेखात माहिती देण्यात आली आहे.
थेट ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करा गिफ्ट वाउचर
- तुम्ही Amazon, Flipkart, Myntra, MakeMyTrip, BookMyShow, Tata CLiQ सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून गिफ्ट वाउचर खरेदी करू शकता.
- सर्वात प्रथम ज्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून गिफ्ट वाउचर खरेदी करायचे आहे, त्या वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर Gift Cards या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला E-Gift Card, Physical Gift Card, Anytime Gift Card आणि Brand Gift Card असे वेगवेगळे पर्याय दिसतील. यापैकी एकाची निवड करा.
- त्यानंतर तुम्हाला गिफ्ट कार्ड कस्टमाइजेशनचा देखील पर्याय दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गिफ्ट कार्डला कस्टमाइज करू शकता. तसेच, त्यावर तुमच्या आवडीचा संदेश देखील लिहिता येईल.
- आता तुम्हाला किती रक्कमेचे गिफ्ट कार्ड खरेदी करायचे आहे, ती रक्कम टाका. तुम्ही अवघ्या 10 रुपयांपासून ते 10000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट कार्ड खरेदी करू शकता
- तुम्ही ई-गिफ्ट कार्ड खरेदी केले असल्यास त्या व्यक्तीच्या ई-मेलवर थेट भेट म्हणून पाठवू शकता. Physical Gift Card असल्यास त्या व्यक्तीचा पत्ता टाका.
- पुढे 'proceed to pay वर क्लिक करून खरेदीची प्रक्रिया पूर्ण करा. अशाप्रकारे, तुम्ही ऑनलाइन माध्यमातून गिफ्ट वाउचर खरेदी करू शकता.
बँकेतही मिळतील गिफ्ट वाउचर
तुम्ही बँकेतून देखील गिफ्ट वाउचर खरेदी करू शकता. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसी बँक, आयडीबीआय सारख्या बँका देखील प्री-पेड कार्ड्स ऑफर करतात. तुम्ही नेट बँकिंगच्या मदतीने किंवा थेट बँकेत जाऊन देखील गिफ्ट वाउचर खरेदी करू शकता.
गिफ्ट वाउचर खरेदी करताना या गोष्टींकडे द्या लक्ष
आवड – तुम्ही ज्या व्यक्तीसाठी गिफ्ट वाउचर खरेदी करत आहात, त्यांची आवड-निवड लक्षात घ्या. यामुळे तुम्हाला योग्य स्टोर, वेबसाइटसाठी वापरता येणारे गिफ्ट वाउचर खरेदी करता येईल.
मुदत कालावधी – प्रत्येक गिफ्ट वाउचर वापरण्याचा एक ठराविक कालावधी असतो. असे वाउचर खरेदी करताना त्यावरील वैधता तपासा. जास्त दिवसांच्या मुदतीमुळे ज्या व्यक्तीला हे वाउचर देत आहात, त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ असेल.
नियम-अटी – वाउचर खरेदी करताना सर्वात आधी त्यासंदर्भातील नियम-अटी जाणून घ्या. यामुळे भविष्यात कोणतीही समस्या येणार नाही. तसेच, वाउचर फक्त ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातूनच वापरू शकतो की स्टोरमध्ये जाऊन देखील खरेदी करता येईल, हे देखील तपासा.