सरकारद्वारे सातत्याने नागरिकांना पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले जात आहे. यासाठी वारंवार मुदत वाढ देखील देण्यात आली होती. अखेर 30 जूनपर्यंत ज्यांनी ही दोन्ही कागदपत्रे लिंक केली नाहीत, त्यांचे पॅन बंद करण्यात आले आहे. पॅन बंद झाल्याने आर्थिक व्यवहार करताना समस्या येऊ शकते. तुमचे पॅन देखील बंद झाले असल्यास 1000 रुपये भरून पुन्हा सुरू करू शकता. यासाठीची प्रोसेस खूपच सोपी आहे. बंद झालेले पॅन तुम्ही पुन्हा कसे सुरू करू शकता? व पॅन-आधार लिंक करणे का गरजेचे आहे? याविषयी जाणून घ्या.
सरकार पॅन-आधार लिंक करण्यास का सांगत आहे?
इनकम टॅक्स रिटर्न – आधार-पॅन लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंगची प्रक्रिया खूपच सोपी होते. इनकम टॅक्स रिटर्न भरल्याचा यामुळे पुरावा द्यावा लागणार नाही. आधारमध्ये नाव, पत्ता, बायोमेट्रिक सर्व माहिती असल्याने ई-फाइलिंगची प्रक्रिया सहज पूर्ण करता येते.
फसवणूक कमी होण्यास मदत – आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. त्यामुळे पॅन-आधार लिंक झाल्यास तुम्हाला सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती सहज मिळते. आयटी विभागाला देखील तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते. तसेच, करचोरी करणाऱ्यांना शोधण्यास देखील याद्वारे मदत मिळेल.
एकापेक्षा अधिक पॅन – अनेकजण एकापेक्षा अधिक पॅनचा वापर करतात. कर भरणे टाळण्यासाठी, फसवणुकीसाठी पॅन कार्डचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पॅन असल्यास आयकर कायद्याच्या कलम 272बी अंतर्गत 10 हजार रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे आधार-पॅन लिंक केल्यास आर्थिक फसवणुकीच्या घटना कमी होतील.
सरकारी योजनांचा फायदा – कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे पॅन आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. अन्यथा सरकारी योजनांचा फायदा घेताना अडचणी येतात. त्यामुळे पॅन-आधार लिंक करणे फायद्याचे ठरते. याशिवाय, बँकेत खाते उघडण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंत सर्वच ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही ही कागदपत्रे लिंक केलेली नसल्यास तुमच्या पॅन बंद होऊ शकते.
बंद झालेले पॅन असे करा सुरू
- बंद झालेले पॅन सुरू करण्यासाठी तुम्हाला incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाइटवर गेल्यानंतर 'e-Pay Tax' पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर पॅन नंबर टाकून CHALLAN NO./ITNS 280 या पर्यायावर जा.
- आता Minor head 500 (Fee) आणि Major head 0021 [Income Tax (Other than Companies)] हे पर्याय निवडून तुम्हाला चलनाचे पैसे भरावे लागतील.
- आता पेमेंट पर्यायाची निवड करा.
- पुढे पॅन, वर्ष आणि पत्ता टाका.
- शेवटी कॅप्चा कोड टाकून Proceed पर्यायावर क्लिक करा.
पॅन कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागतो. पॅन पुन्हा सुरू झाल्यावर तुम्ही आधारशी लिंक करू शकता. लक्षात ठेवा की, पॅन पुन्हा सुरू न केल्यास अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहार करताना समस्या येऊ शकते.