काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2024 साठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत संघांनी 72 खेळाडूंसाठी जवळपास 230.45 कोटी रुपयांची बोली लावली. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स या खेळाडूंना तब्बल 20 कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली लावत खरेदी करण्यात आले. तर अनेक नवीन खेळाडूंवर देखील लाखो रुपयांची बोली लावण्यात आली.
जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक असलेल्या आयपीएलच्या माध्यमातून अनेक नवीन खेळाडूंना स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेने अनेक खेळाडूंना लखपती, कोट्याधीश देखील बनवले आहे. या लेखातून आयपीएल खेळणारे खेळाडू वर्षाला किती कमाई करतात? याबाबत जाणून घेऊया.
खेळाडूंची कमाई कोट्यावधी रुपये
आयपीएलच्या एका सीझनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूची कमाई ही कोट्यावधी रुपये असते. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या खेळाडूंची कमाई इतर खेळाडूंच्या तुलनेत जास्त असते. काही खेळाडूंवर दरवर्षी लिलावात बोली लावली जाते, तर काही खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय संघांकडून घेतला जातो.
विराट कोहली, एमएस धोनी, मोहम्मद सिराज, रोहित शर्मा या खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय त्यांच्या संघांनी घेतला आहे. त्यामुळे संघाने ज्या किंमतीत त्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तेवढी रक्कम त्यांना मिळते.
समजा, एखाद्या खेळाडूला त्या सीझनसाठी 5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले असल्यास, त्याला फक्त तोच सीझन खेळण्यासाठी तेवढी रक्कम मिळते. समजा, संघ व खेळाडूतील करार 3 वर्षाचा असल्यास प्रत्येक वर्षानुसार एकूण 15 कोटी रुपये मिळतील.
आयपीएलच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना संधी
आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूवर किती रक्कमेची बोली लागेल हे सांगता येत नाही. स्थानिक स्पर्धा, अंडर-19 संघांसाठी खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे. या खेळाडूंसाठी संघांकडून लाखो रुपयांची बोली देखील लावली जाते.
2024 च्या लिलावात अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीला चेन्नईच्या संघाने तब्बल 8.40 कोटी रुपये खर्चून खरेदी केले आहे. तर भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अर्शिन कुलकर्णी या खेळाडूला लखनऊच्या संघांने 20 लाखात खरेदी केले.
थोडक्यात, आयपीएल खेळणारे क्रिकेटपटू वर्षाला जवळपास 20 लाख रुपयांपासून ते 20 कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. त्यांच्या कमाईचा आकडा हा संघाने त्यांच्यावर लावलेल्या बोलीवरून ठरतो.
खेळाडूंना पैसे कसे दिले जातात?
प्रत्येक संघाचे खेळाडूंना पैसे देण्याचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहे. काही संघ स्पर्धेच्या सुरुवातीलाच संपूर्ण रक्कम खेळाडूंना देतात. तर काही संघ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एकूण रक्कमेच्या 15 टक्के, स्पर्धेदरम्यान 65 टक्के आणि स्पर्धा झाल्यावर 20 टक्के रक्कम देतात. खेळाडूंना मिळणाऱ्या रक्कमेवर कर देखील आकारला जातो. तसेच, परदेशी खेळाडूंना मिळणाऱ्या रक्कमेतील काही हिस्सा त्यांच्या क्रिकेट बोर्डाला देखील दिला जातो.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच खेळाडू बाहेर पडल्यास त्याला पैसे दिले जात नाहीत. मात्र, संघात सहभागी असतानाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही तरीही कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली जाते. याशिवाय, दुखापत झाल्यास संघाकडून उपचाराचा खर्च उचलला जातो.