‘ मुलगी शिकली प्रगती झाली ’ , ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ ’ अशी घोषवाक्य आपल्या कानावर अनेकदा पडतात. परंतु, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येत नाही. प्रामुख्याने ग्रामीण भागात सोयी सुविधांचा अभाव, आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्याने अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.
मात्र, मुलींना शिक्षण पूर्ण करताना आर्थिक समस्या येऊ नये यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. याशिवाय, अनेक बँका कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज देखील उपलब्ध करतात.
तुम्ही देखील तुमच्या मुलींना उच्च शिक्षण देण्याचा विचार करत असाल तर शैक्षणिक कर्ज कशाप्रकारे मिळू शकते, त्याबाबत जाणून घ्या.
या सरकारी योजनांचा घ्या लाभ
लेक लाडकी योजना | महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वीच लेक लाडकी योजनेला मंजूरी दिली आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्ष पूर्ण होईलपर्यंत 1 लाख 1 हजार रुपये सरकारकडून दिले जातात. गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे, हा या योजने मागचा उद्देश आहे. योजनेंतर्गत मुलगी जन्माला आल्यानंतर 5 हजार रुपये दिले जातील. त्यानंतर पहिली, सहावी, 11वीला गेल्यावर टप्प्याने पैसे दिले जातील. तसेच, मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जातील. अशाप्रकारे, एकूण 1 लाख 1 हजार रुपये सरकारकडून मिळतील. ही केवळ शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणारी योजना नसली तरीही यांतर्गत मिळणाऱ्या रक्कमेचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी नक्कीच केला जाऊ शकतो. |
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना | महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे ही योजना राबवली जाते. या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य केले जाते. योजनेंतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज शुल्काच्या 50 ते 100 टक्के रक्कम मिळते. |
स्कॉलरशिप
उडान योजना | CBSE द्वारे मुलींसाठी उडान योजना राबविली जाते. या अंतर्गत 10वी, 12वी नंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी ही स्कॉलरशिप राबविली जाते. 10वी, 12वी मध्ये चांगले मार्क असणाऱ्या विद्यार्थीनी स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या मुलींना आर्थिक मदत तर दिली जातेच. सोबतच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परिक्षांची तयारी देखील त्यांच्याकडून करवून घेतली जाते. विद्यार्थींना अभ्यासासाठी आवश्यक असलेली पुस्तके दिली जातात. |
प्रगती स्कॉलरशिप | All India Council For Technical Education द्वारे ही स्कॉलरशिप योजना राबविली जाते. तांत्रिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा फायदा मिळतो. पदवी अथवा डिप्लोमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थींनी याचा फायदा घेऊ शकतात. या अंतर्गत शिक्षणासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. |
बँका शिक्षणासाठी देतात कमी व्याजदरात कर्ज
अनेक बँकांद्वारे मुलींच्या शिक्षणासाठी कर्ज योजना राबविल्या जातात. विशेष म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन शैक्षणिक कर्जाबाबत चौकशी करू शकता. त्यानंतर विविध बँकांच्या कर्जाची तुलना करून अर्ज करावा लागेल.
एसबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक, कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया सारख्या बँका 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करतात. याशिवाय, या कर्जामध्ये कॉलेज, हॉस्टेल शुल्क, प्रवास शुल्क, पुस्तक-साहित्य इत्यादी खर्चाचा देखील समावेश असतो.