Voluntary Provident Fund: निवृत्तीनंतरचे आयुष्य निवांत आणि सुखात घालवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यामध्ये प्रामुख्याने फिक्सड् डिपॉझिट, म्युच्युअल फंड, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, राष्ट्रीय निवृत्ती योजना आणि भविष्य निर्वाह निधी (Provident Fund-PF) या योजनांचा समावेश असतो. अनेक कंपन्यांमध्ये पीएफ पगारातून कापून घेतला जात असल्याने कर्मचाऱ्यांची सक्तीने बचत होते.
प्रोव्हिडंट फंडमध्ये जमा होणारा निधी हा कर्मचाऱ्याच्या पगारातून प्रत्येक महिन्याला कापला जातो. त्यामध्ये कर्मचाऱ्याबरोबरच कंपनीलाही एक भाग जमा करावा लागतो. पण तुम्हाला पीएफप्रमाणेच वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (Voluntary Provident Fund-VPF) बद्दल माहिती आहे का? नसेल तर त्याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
व्हीपीएफ काय आहे?
वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड हा पगारदार व्यक्तींसाठी पीएफप्रमाणे सक्तीने करण्याची गुंतवणूक योजना नाही. पण याचा फायदा मात्र नक्कीच आहे. कारण या योजनेला सरकारचे पाठबळ असून, यामध्ये जोखीम कमी आणि परतावा अधिक आहे. व्हीपीएफचे पूर्ण नाव तुम्हाला आतापर्यंत कळले असेलच, वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (Voluntary Provident Fund).
वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड हा एक रिटायरमेंट फंड असून यासाठी लागणारा निधी हा कर्मचाऱ्याच्या पगारातूनच स्वीकारला जातो. म्हणजे कर्मचाऱ्या पगारातून ज्याप्रमाणे प्रोव्हिडंट फंडसाठी काही रक्कम कापली जाते. त्यातील काही रक्कम ही वॉलेंटरी फंडसाठी वळवता येते. कर्मचारी आणि कंपनी दोघांनाही व्हीपीएफसाठी गुंतवणूक करणे सक्तीचे नाही. ही एक ऐच्छिक गुंतवणूक योजना आहे. पण एकदा का तुम्ही व्हीपीएफ योजनेची निवड केली तर त्यात किमान 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यापूर्वी ती बंद करता येत नाही.
व्हीपीएफ मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (व्हीपीएफ) हा ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा एक भाग आहे. त्यामुळे ईपीएफ प्रमाणेच व्हीपीएफमध्ये पगारदार आणि नोकरदार व्यक्ती गुंतवणूक करू शकतात.
वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंडचे फायदे
वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड हा EEE या प्रकारामध्ये मोडणारी गुंतवणूक आहे. इथे E म्हणजे Exempt (सूट, सवलत) असा अर्थ आहे. आता यामध्ये कर्मचाऱ्याला तीनप्रकारे सवलत मिळते. ती म्हणजे कॉन्ट्रीब्युशन, मुद्दल आणि व्याज. टॅक्स सेव्हिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
सुरक्षित गुंतवणूक योजना
वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड ही योजना सरकारद्वारे राबवली जात असल्याने यामध्ये जोखीम नाही. तसेच सरकारने याचा व्याजदर व्याजदर फिक्सड् केल्याने कर्मचाऱ्यांसाठी ही एक दीर्घकालीन, सुरक्षित, निश्चित परतावा मिळवून देणारी आणि जोखीममुक्त गुंतवणूक योजना आहे.
उच्चा परतावा
वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंडवर सरकार सध्या वार्षिक 8.5 टक्के व्याज देत आहे. यामध्ये एका आर्थिक वर्षात 1.50 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते आणि यावर मिळणारे व्याज हे इन्कम टॅक्स कायद्यातील सेक्शन 80C अंतर्गत करमुक्त आहे. त्यामुळे भविष्यात यातून एक चांगला फंड निर्माण होण्यास मदत होते.
लगेच खाते सुरू करता येते
व्हीपीएफचे खाते सुरू करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला आपल्या कंपनीच्या एचआर किंवा अकाउंट टीमशी संपर्क साधावा लागेल. त्यांच्याद्वारे व्हीपीएफसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरून पगारातून अतिरिक्त रक्कम कापण्यासाठी अर्ज करावा लागतो. पीएफ खात्याचा व्हीपीएफ खात्यासाठी वापर केला जाऊ शकतो. तसेच जर तुम्ही एखादी कंपनी बदलली तर याचे पीएफच्या खात्याप्रमाणे ट्रान्सफर सुद्धा करता येते.