ग्रामीण भागात शेत जमिनीच्या हद्दीवरून बरेच वाद होतात. अनेकवेळा आपल्या सातबारा उताऱ्यावर जेवढ्या क्षेत्राची नोंद असते तेवढे क्षेत्र वहिवटीमध्ये प्रत्यक्षात दिसत नाही. किंवा अनेकदा अतिक्रमण करून जमीन हडपण्याचे प्रकार घडत असतात. अशा वेळी शासकीय नोंदीप्रमाणे जमिनीची मोजणी (Land survey) करता येते. शासकीय पद्धतीने मोजणी केल्यानंतर शेतकऱ्याच्या मनातील शंकाही दूर होतात. शिवाय जर जमिनीवर अतिक्रमण झाले असल्यास त्यावर ताबा मिळवून आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करता येऊ शकते. दरम्यान, शासकीय पद्धतीने शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी नेमका किती खर्च येतो? त्यासाठी लागणारा कालावधी काय आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा याबाबतची माहिती आपण आज जाणून घेऊ.
अचूक क्षेत्रफळ जाणून घेण्यासाठी मोजणी आवश्यक-
कित्येकदा शेत जमिनीवर बाजूच्या शेतकऱ्यांकडून अतिक्रमण झाल्याच्या घटना घडतात, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नातील घट याबरोबरच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. अथवा जर एखाद्या व्यक्तीस नवीन जमीन खरेदी करायची असल्यास किंवा स्वत:ची जमीन विकायची असल्यास त्याचे अचूक क्षेत्र काढण्यासाठी देखील सरकारी मोजणी करण्याचा विचार केला जातो. या परिस्थितीत शेतकऱ्याला भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षकाकडे मोजणीसाठी अर्ज करता येतो. या अर्जाचा नमुना सरकारच्या ( https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in ) या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
मोजणीसाठी अर्ज प्रक्रिया
- अर्जावर मोजणीसाठी अर्ज हे शिर्षक लिहलेले असते.
- अर्जदारास मोजणीचा अर्ज आवश्यक माहिती भरून द्यायचा आहे.
- अर्जदाराचे नाव, गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या नावाची माहिती द्यावी
- मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील द्यावा
- मोजणीचा कालवधी आणि मोजणीचा उद्देश याबाबतची माहिती
- त्यानंतर अर्जदाराने मोजणी मालमत्तेच्या गावाचे नाव, तालुका आणि शेतजमिनीचा गट क्रमांक लिहावा.
- जमिनीच्या उताऱ्यावरील इतर खातेदारांची नावे लिहायची आहेत.
उपरोक्त माहिती भरल्यानंतर सरकारी मोजणी फीचा तपशील द्यायचा आहे. शेत जमीन मोजणीसाठी फी ही क्षेत्रफळानुसार आकारली जाते. अर्जदाराने सरकारी नियमान्वये जी एकूण फी आहे ती चलन किंवा रोखीने शासकीय पावती घेऊन भरणा करणे आवश्यक आहे. ते चलन भूमीअभिलेख कार्यालयात इतर कागदपत्रासोबत जमा करावे. मोजणी करता शासकीय नियमानुसार पुढील प्रमाणे फी आकारण्यात येते.
जमीन मोजणीची फी : Jamin Mojani Fees
मोजणीचा प्रकार | मोजणीची फी |
साधी मोजणी | 1000/- रुपये प्रति हेक्टर |
तातडीची मोजणी | 2000/- रुपये प्रति हेक्टर |
अतितातडीची मोजणी | 3000/- रुपये प्रति हेक्टर |
जमीन मोजणीचा कालावधी-
जमीन मोजणीचा कालावधी- जमीन मोजणीचे साधारण पणे तीन प्रकार पडतात. यामध्ये साधी मोजणी म्हणजे त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी, तातडीच्या मोजणीसाठी 3 महिन्यांचा कालावधी, तर अति तातडीच्या मोजणीसाठी 2 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
जमीन मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे-
- शेतजमिनीच्या मोजणीचा अर्ज
- मोजणी फी भरलेले चलन अथवा पावती
- 3 महिन्याच्या आतील सातबारा उतारा
- ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज संबंधित भूमि अभिलेख कार्यालयात दाखल करावीत