Kharif Sowing: देशात मान्सूनचे आगमन उशीरा झाले. तसेच पावसाचे असमान वितरण असल्याने अनेक भागातील शेतकरी पावसाची अद्यापही वाट पाहत आहेत. जुलै महिन्यापासून पावसाचे प्रमाण वाढले असेल तर ते पुरेसे नाही.
पावसाच्या लहरीपणामुळे देशातील खरीप हंगामातील पेरणी 9 टक्क्यांनी घटली आहे. अद्यापही चांगला पाऊस झाला तर पेरणीखालील क्षेत्र वाढू शकते. जर खरीपाची पेरणी कमी झाली तर महागाईचा सामना करावा लागू शकतो.
खरीप हंगामातील भात, सोयाबीन, मसूर, तूर, कापूस या पिकांची लागवड कमालीची रोडावली आहे. तसेच जर पेरणीस उशीर झाला तर उत्पादनही रोडावण्याची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची नितांत गरज आहे. जर या महिन्यांत पावसाने ओढ दिली तर पिके धोक्यात येऊ शकतात.
कृषी उत्पादन घटले तर महागाई अटळ
मसूर पिकाची लागवड मागील वर्षाच्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर उडीद पिकाची लागवड 31 टक्क्यांनी कमी झाली आहे. लहरी आणि असमान पावसामुळे जर खरीप हंगामातील पिक वाया गेले तर पुढील वर्षभरापर्यंत दरवाढ राहू शकते. अन्नधान्य महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिक हतबल झाला असून उत्पादन कमी झाले तर कृषी क्षेत्रासोबतच इतरही अनेक क्षेत्रांना फटका बसेल.
महाराष्ट्र, कर्नाटकात पाऊस असमान
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झाला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत कर्नाटकमध्ये 36% कमी पाऊस झालाय. तर महाराष्ट्रातील विविध भागात 31 ते 43% पाऊस कमी पडलाय. राज्यातील उडीद पिकाची पेरणी कमालाची रोडावली आहे.
उत्तरेत भाताचे लागवडीखालील क्षेत्र कमी
खरीप हंगामात भात पिकाची सर्वाधिक लागवड होते. 7 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे 5 मिलियन हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही लागवड 24 टक्क्यांनी कमी आहे. पंजाब, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातील भात पिकाची लागवड रोडावली आहे.