कोणत्याही व्यवसायासाठी ‘ब्रँड वॅल्यू’ ही अत्यंत महत्त्वाची असते. अगदी कपड्यांपासून ते गाडी खरेदी करण्यापर्यंत... ग्राहक प्रत्येक गोष्ट खरेदी करताना आधी कंपनीचे नाव पाहतात. त्यामुळे अनेकजण व्यवसाय सुरू करताना बाजारात आधीपासूनच नावलौकिक असलेल्या एखाद्या कंपनीची फ्रेंचाइजी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. एखाद्या चांगल्या कंपनीची फ्रेंचाइजी घेणे ही नक्कीच चांगली कल्पना आहे. मात्र, फ्रेंचाइजी घेतली म्हणजे त्यातून नफा मिळेलच असे नाही. त्यामुळे फ्रेंचाइजी घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
फ्रेंचाइजी घेणे म्हणजे नक्की काय?
तुम्ही तुमच्या आजुबाजूला अगदी कात्रज डेअरीपासून ते सीसीडीपर्यंत अनेक व्यवसायांच्या फ्रेंचाइजी पाहिल्या असतील. फ्रेंचाइजीच्या माध्यमातूनच या व्यवसायांचा विस्तार होतो. फ्रेंचाइजी हे एकप्रकारचे बिझनेस मॉडेल आहे, ज्यात इतर कंपनीचा व्यवसाय परवाना घेऊन चालवता येतो.
यामध्ये फ्रेंचाइजी विकणारी व्यक्ती ही कंपनीचे नाव, ट्रेडमार्क व वस्तू विकण्याची परवानगी देत असतो. यासाठी फ्रेंचाइजी फी व रॉयल्टी फी घेतली जाऊ शकते. तसेच, करारामध्ये व्यवसायाच्या नफा-तोट्यानुसार इतरही अटींचा समावेश केला जाऊ शकतो.
फ्रेंचाइजी घेताना या गोष्टी ठेवा लक्षात
योग्य व्यवसायाची करा निवड | फ्रेंचाइजी घेतााना योग्य व्यवसायाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या आजुबाजूला फ्रेंचाइजी देणारे 100 व्यवसाय सापडतील. अगदी खाद्य पदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत विविध व्यवसायांच्या फ्रेंचाइजी उपलब्ध आहे. मात्र, कोणत्या व्यवसायात सर्वाधिक फायदा होऊ शकतो, तुमची आवड काय आहे व व्यवसायासाठी किती वेळ देऊ शकता? त्याच व्यवसायाशी संबंधित इतर फ्रेंचाइजी नफ्त्यात आहेत का? याचा विचार करून फ्रेंचाइजी निवडा. |
तुमच्या स्पर्धकांची माहिती घ्या | व्यवसायात उतरण्याआधी स्पर्धकांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जो व्यवसाय करणार आहात, त्याच्याशी संबंधित इतर व्यवसाय आजुबाजूला आहेत का हे पाहा. तसेच, ज्या ठिकाणी फ्रेंचाइजी घेत आहात, तेथे ग्राहक येऊ शकतात का याची माहिती करूनच निर्णय घ्या. |
फ्रेंचाइजी फी व रॉयल्टी फी | फ्रेंचाइजी घेताना तुम्हाला यासाठी पहिल्यांदा फी भरावी लागते. ही फी प्रत्येक व्यवसायानुसार वेगळी असू शकते. ही फी दिल्यानंतरच तुम्हाला कंपनीचे नाव, वस्तू वापरण्याची परवानगी मिळते. याशिवाय, तुम्हाला वस्तूच्या विक्रीनुसार रॉयल्टी फी देखील द्यावी लागते. त्यामुळे फ्रेंचाइजी घेताना शुल्य, कराराचा कालावधी व इतर अटींविषयी संपूर्ण माहिती घ्या. |
प्रशिक्षण | फ्रेंचाइजी चालवताना तुम्ही कंपनीचे नाव वापरत असता. त्यामुळे कंपनीचे नाव खराब होऊ नये यासाठी फ्रेंचाइजी घेणाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. हे प्रशिक्षण व्यवसायाशी संबंधितच असते. त्यामुळे तुम्ही ज्या कंपनीची फ्रेंचाइजी घेत आहात, त्यांच्याकडून प्रशिक्षण मिळणार आहे की नाही, हे जाणून घ्या. कारण काहीप्रमाणात या प्रशिक्षणावरच तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून असते. |
फ्रेंचाइजीमधून असे कमवा पैसे
सर्वात प्रसिद्ध व्यवसायाची फ्रेंचाइजी घेतली याचा अर्थ तुम्ही नेहमी नफ्यातच राहाल असे नाही. मात्र, योग्य व्यवसाय व जागेची निवड नक्कीच तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. फ्रेंचाइजी घेतल्यानंतर कंपनी सर्व सोयी सुविधा पुरवत असते, मात्र यासाठी गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल.
बाजारात प्रसिद्ध असलेल्या कंपनीची फ्रेंचाइजी घेतल्यास निश्चितच तुम्ही यातून पैसे कमवू शकता. कारण, ग्राहक हे अशा प्रसिद्ध कंपनीच्या नावाकडे आकर्षित होत असतात. कोणताही व्यवसाय हा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत स्वतःच्या सेवा व वस्तू पोहचविण्यात यशस्वी ठरला तरच फायद्यात राहतो.
तुम्ही कंपनीकडून स्वस्त दरात वस्तू खरेदी करून जास्त किंमतीत विक्री करू शकता. यामुळे जास्तीत जास्त नफा होईल. याशिवाय, रॉयल्टी फी देखील जेवढी कमी असेल तेवढा अधिक तुमचा फायदा होईल. कारण, वस्तूंच्या विक्रीवर कंपनीला ठरेलली रॉयल्टी फी द्यावी लागेल. त्यामुळे कंपनीशी करार करताना रॉयल्टी फीबद्दल संपूर्ण माहिती घ्या.