RBI Penalty: 24 मार्च रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 लाख रु.चा दंड करूर वैश्य बँकेला ठोठावला आहे . आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल करूर वैश्य बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने केलेल्या तपासणी दरम्यान, असे आढळून आले की बँकेने RBI ला फसवणूकीच्या खात्यांबद्दल (Fraud Bank Accounts) माहिती दिली नाही. RBI च्या 2016 च्या निर्देशांनुसार सर्व बँकांसाठी अशा खात्यांची माहिती वेळोवेळी आरबीआयला देणे अनिवार्य आहे.
करूर वैश्य बँकेची तपासणी 21 फेब्रुवारी 2022 ते 4 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आली होती आणि बँकेला नोटीस बजावून त्यावर कारवाई का करू नये याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. बँकेने कारणे दाखवा नोटीसला उत्तर देखील दिले होते. परंतु समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आरबीआयने बँकेला दंड ठोठावला आहे. बँकेत होणारे पैशांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी रिझर्व बँक वेळोवेळी इतर बँकांकडून खातेदारांची माहिती मागवत असते. याद्वारे बेहिशोबी पैशांची देवाणघेवाण ज्या खात्यांमधून होताना दिसते त्याची तपासणी केली जाते. अशा खात्यांना गोठवण्याचे अधिकार देखील आरबीआयकडे आहेत. त्यामुळे आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे देशातील सर्व बँकांना बंधनकारक आहेत.
RBI imposes monetary penalty of Rs. 30 lakh on Karur Vysya Bank#KarurVysyaBank #INE036D01028 #KVB #MonetaryPenalty #RBI https://t.co/6f9xtzqD3n pic.twitter.com/XUP3eY4UIG
— EquityBulls.com (@equitybulls) March 25, 2023
आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात, करूर वैश्य बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटलें आहे. बंधनकारक नियमांचे पालन न केल्यामुळे बँकेला दंड ठोठावण्यात आला असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे, करूर वैश्य बँकेने डिसेंबर तिमाहीत 289 कोटी रुपये इतका नफा कमावला आहे जो मागील वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कमावलेल्या नफ्यापेक्षा 30 टक्के अधिक आहे.
यापूर्वी रिझव्र्ह बँकेने RBL बँकेवर 2.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कर्ज वसुली एजंटांशी संबंधित काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती.आरबीआयच्या नियमांचे पालन न करणाऱ्या बँकावर अशा कारवाया याआधी देखील झालेल्या आहेत. आरबीआयकडे करूर वैश्य बँकेविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कुणीही सामान्य नागरिक, बँक खातेधारक आरबीआयकडे अशी तक्रार करू शकतात. तक्रारीत तथ्य आढळ्यास आरबीआय बँकावर कारवाई करते.
तमिळनाडू राज्यातील करुर येथे खाजगी शेड्युल्ड बँक म्हणून 1916 साली करूर वैश्य बँकेची सुरुवात झाली.दक्षिणेतील राज्यांमध्ये या बँकेचे मोठे प्रस्थ आहे. या बँकेच्या देशभरात 788 शाखा आणि 1803 एटीएम आहेत.