शेतकऱ्यांच्या दैनदिन उत्पन्नाचे साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय मानला जातो. शेतीला पुरक असणाऱ्या या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. मात्र, सद्यस्थितीत उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुध दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दराची मागणी केली जाते. शेतकऱ्यांच्या या मागणीचाच विचार करून शेजारील कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 3 रुपये भाव वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागातील शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय-
कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील सरकारने 1 ऑगस्टपासून गाईच्या दुधाला प्रति लिटर 3 रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीनंतर कर्नाटकातील शेतकऱ्यांना आता गाईच्या दुधाला प्रतिलिटर 33 रुपये दर मिळणार आहे. कर्नाटकमधील सर्वच दुध संघांनी प्रतिलिटर 5 रुपयांनी दूध दर वाढ करण्याची मागणी केली होती.अखेर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन 3 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादन खर्चाची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर 3 रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाईल, असेही सरकारने जाहीर केले.
सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना फायदा-
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील अनेक शेतकरी आपल्या दुग्ध व्यवसायातून निघणारे दूध हे कर्नाटकातील दूध संघामध्ये विक्री करतात. आता या दूध दर वाढीचा या शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. गडहिंग्लज, जत, अक्कलकोट,दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्राहकांना फटका-
कर्नाटकमध्ये आता नंदिनी-ब्रँड टोनेड दुधाची एक लिटर किंमत 39 प्रति लीटर आहे. मात्र, या दुध दर वाढीनंतर ग्राहकांना आता ते 42 रुपयांना खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकमधील जनतेचे या दूध दरवाढीमुळे बजेट कोलमडणार आहे.