कर्नाटक सरकारकडून डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना (Insurance For delivery boy ) जाहीर करण्यात आली आहे. स्विग्गी (Swiggy), झोमॅटो (Zomato), ॲमेझॉन (Amazon) यासह इत्यादी ई-कॉमर्स कंपन्या बहुतांशी डिलिव्हरी कामगारांना विमा संरक्षण देत नाहीत. त्यावर कर्नाटक सरकारने या कामगारांना 4 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यामध्ये काहीजण पूर्णवेळ किंवा अर्धवेळ डिलिव्हरी कर्मचारी म्हणून काम करत असतात. उन्ह वारा, पाऊस असो अथवा थंडी हे डिलिव्हरी कर्मचारी आपली सेवा बजावत असतात. मात्र काही वेळा नैसर्गिक आपत्ती अथवा अपघातासारख्या दुर्दैवी घटनांना या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक सरकारने विमा संरक्षण योजना जाहीर केली आहे.
जीवन आणि अपघात विमा
कर्नाटक सरकारकडून डिलिव्हरी कामगारांसाठी एकूण 4 लाख रुपयांचे मोफत अपघाती आणि जीवन विमा संरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यासाठीचा वार्षिक प्रीमियमचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. यामध्ये 2 लाखांचा जीवन विमा आणि 2 लाख रुपयांचा अपघाती विमा समाविष्ट करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पात या विमा संरक्षणाबाबतची घोषणा करण्यात आली आहे.