Torra: प्रत्येकाला इच्छा असते की आपण स्वत:चं काहीतरी सुरु करावं, हाच विचार मनात ठेऊन कल्पना वंदना यांनी स्वत:चे कलागुण लक्षात घेऊन त्यावर काम करायला सुरुवात केली, आणि त्यातूनच 'तोरा' ब्रॅण्ड निर्माण झाला. स्पर्धेच्या युगात वाव मिळावा म्हणून पुणे-मुंबईमध्ये काम करण्यापेक्षा त्यांनी ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरातून सुरुवात करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी कोल्हापूरची निवड करून आपल्याला व्यावसायाला सुरूवात केली. आज त्या मोठ्या अभिमानाने आपला 'तोरा' मिरवत आहेत.
कल्पना वंदना यांचा तोऱ्याचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी एकदा सहजच स्वत: इरकल साडी नेसून स्वत:चे फोटो कल्पना यांनी सोशल मिडीयावर वर अपलोड केले. तेव्हा अनेकांकडून साडीची स्तुती करण्यात आली, साडीच्या किंमतीची, कुठून घेतली?, मला सुद्धा हवी आहे यांसारख्या प्रश्नांची विचारणा झाली. आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने कल्पना यांच्यातल्या उद्योजिकेचा जन्म झाला.
वर्तमानपत्र, प्रसार माध्यमे यांतील वेग-वेगळ्या क्षेत्रात काम केल्यानंतर एका चांगल्या ठिकाणी मराठी भाषा विशेतज्ञ म्हणून नोकरी करत असतांना एका अमराठी व्यक्तीने कल्पना यांना त्यांची मराठी भाषा कशी चुकतेय, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मराठी माध्यमात शिकलेल्या, मराठी वृत्तपत्रात लेख लिहिणाऱ्या, मराठी भाषा जगवण्यासाठी झटणाऱ्या कल्पना यांना प्रचंड वाईट वाटलं . त्यावेळीच त्यांनी नोकरी न करता स्वत:, स्वत: साठी, मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी मराठमोळ-अस्सल असं काहीतरी करावं हे ठरवलं, आणि तेव्हाच त्यांनी मिडीयाचे प्रसिद्ध क्षेत्र सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
Table of contents [Show]
व्यवसाय वाढवणारी पॅकेजिंग स्ट्रॅटेजी
कोल्हापुरातून सुरुवात केल्यामुळे कोल्हापुरातील प्रत्येक गोष्टीतली विविधता लक्षात घेऊन सुरुवातीला इरकल त्यांनतर कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चांदीचे दागिने या गोष्टींची भर त्यांनी ‘तोरा’ मध्ये केली. व्यवसाय वाढवण्यासाठी एक कोणतीही साडी किंवा साज ग्राहकांनी विकत घेतल्यावर त्यासोबत कोल्हापुरी चटणी फ्री अशी शक्कल त्यांनी वापरली. तसेच, तोराचा ग्राहकांच्या मनात राहावा म्हणून ‘तोराकडून खरेदी केल्याबद्दल धन्यवाद’ असा आशय हाताने लिहलेले कार्ड सोबत देऊन मलमल चे कापड वापरून कल्पना स्वत: पॅकिंग करून ग्राहकांना देत असत, या पॅकिंगचे ग्राहकांकडून कौतुक झाल्याचे त्या सांगतात.
आंतरराष्ट्रीय पातळीवर तोराची जादू
आतापर्यंत तोरासोबत 6000 पेक्षा जास्त ग्राहक जोडलेले आहेत. प्रत्येक सणाला तोराकडून ऑफर्स दिल्या जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा तोराचे ग्राहक आहेत. कल्पना यांनी सिंगापूर येथे साड्यांचे आणि वेग-वेगळ्या सामग्रीचे प्रदर्शन ठेवले होते. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कल्पना सांगतात. सध्या 4 जणांची टीम तोरासाठी काम करते. ब्रॅण्डिंगचे काम लंडनमध्ये राहणाऱ्या पंकजा करतात तर 2 व्यक्ती वेबसाईटची जबाबदारी पार पाडत असतात.
लिव्हिंग रूम ते पहिले शॉप
2019 ला सुरुवात झालेल्या तोराचे ऑफिस आधी कल्पना यांच्या भाड्याच्या घरातील लिव्हिंग रूम मध्ये होते. तिथे स्त्रिया यायच्या, साड्या, दागिने पाहायच्या आणि आवडेल ते घेऊन किंवा ऑर्डर देऊन जायच्या. इरकल साड्यांचा खजिना असणाऱ्या तोराचे आता पहिले शॉप भिवंडी येथे सुरु होत आहे.
मराठी महिलांना 'तोरा'मध्ये संधी
तोरा मध्ये काम करत असणारी टीम मराठी असून आमच्याकडून साड्या विकत घेऊन दुसरीकडे विकणाऱ्या 550 महिला तोरासोबत जोडल्या गेल्या आहेत. काहीवेळा कोणी महिलांनी इरकल शिवाय वेगळ्या कापडाच्या किंवा रोज वापरता येतील अशा साड्यांची मागणी कल्पना यांच्याकडे केली तर त्या रिसेलर्स महिलांना संधी देऊन ग्राहकांना त्यांच्यापर्यंत पोहचवतात.
महाराष्ट्र ही मराठी माणसांची भूमी आहे. प्रत्येक मराठी माणसाने सशक्तपणे उभे राहून लाज न बाळगता स्वत:चा व्यवसाय सुरु करायला पाहिजे. मेहनतीला दुसरा पर्याय नाही, त्यामुळे इतरांना कॉपी न करता स्वत: ला काय चांगलं येत ते जाणून घेऊन अजून चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. संयम राखून व्यवसायाची काळजी घेतली, लोकांच्या गरजा ओळखल्या, वेगळेपण जपलं, आणि मेक इट सिम्पल हा फॉर्मुला जर वापरला तर नक्कीच व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास कल्पना यांना आहे.