Kaivalya Vohra Zepto: असंख्य अडचणी पार करून व्यवसाय उभा करणं काही सोपं काम नाही. स्टार्टअपची दुनिया जसे यश दाखवते तसं अपयशाने जमिनीवरही आणते. मागील काही वर्षात अनेक स्टार्टअप तोट्यात गेल्याचं तुम्ही पाहिलं असेल. एकूणच हा प्रवास रोमांचकारी असतो. Zepto चे सह-संस्थापक कैवल्य व्होरा यांचा व्यवसायिक प्रवास असाच आव्हानात्मक राहिला आहे. नामांकित स्टॅन्डफोर्डमधून ड्रॉप आऊट झालेल्या तरुणाने सात हजार कोटींचं साम्राज्य उभारलं.
अवघ्या विसाव्या वर्षी व्यवसायात यश
कैवल्य व्होरा याचं वय अवघे 20 वर्ष आहे. मात्र, एवढ्या कमी वयातही त्याने Zepto या ऑनलाइन डिलिव्हिरी व्यवसायात पाय रोवला. सध्या तो झेप्टो कंपनींचा सह-संस्थापक आणि मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) आहे. फोर्ब्ज मासिकाच्या आशियातील प्रभावशाली 30 Under 30 यादीत त्यांने स्थान मिळवले. तसेच IIFL Wealth Hurun India Rich List in 2022 मध्ये यंगेस्ट इंडियन बिलेनियर म्हणूनही त्याचे नाव झळकले.
व्यावसायिक प्रवास कसा सुरू झाला?
कोरोनासाथ सुरू असताना कैवल्यने आदित पलिचा याच्यासोबत मिळून 2021 मध्ये Zepto ची सुरुवात केली. ऑनलाइन ग्रोसरी व्यवसायात झेप्टोने अल्पावधीत नाव कमावले. ऑनलाइन ग्रोसरी व्यवसायात मोठी स्पर्धा असतानाही त्यांनी नवे ग्राहक मिळवले. किराणा माल (ग्रोसरी) आणि घरगुती वस्तू डिलिव्हरीमध्ये झोमॅटो, स्वीगीसोबत टाटा, रिलायन्स असे मोठे प्लेयर्ससुद्धा उतरले आहेत. कोरोना काळात नागरिक घरामध्ये अडकून पडले होते. त्यावेळी ऑनलाइन डिलिव्हरी व्यवसायाची आयडिया कैवल्य आणि आदित या दोघांना सत्यात उतरवली.
कैवल्य व्होराचे शिक्षण
कॉम्प्युटर सायन्स शिकण्यासाठी कैवल्य व्होरा अमेरिकेतील स्टॅडफोर्ड विद्यापीठात गेला होता. मात्र, कोरोना काळात ऑनलाइन क्लास सुरू झाल्यानंतर कैवल्य आणि त्याचा क्लासमेट आदित याने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी इ-ग्रोसरी कंपनी उभी करण्यासाठी काम सुरू केले.
कैवल्य व्होरा याचा जन्म 15 मार्च 2003 रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला. सुरुवातीला दोघांनी मिळून किराणाकार्ट नावाने ऑनलाइन ग्रोसरी कंपनी सुरू केली होती. 45 मिनिटांमध्ये ते किराणा घरपोहच करत होते. मात्र, नंतर त्यांनी या कंपनीचे नाव झेप्टो असे ठेवले. सुरुवातीला त्यांनी मुंबई, बंगळुरू अशा शहरांमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी सुरू केली. आता देशभरात त्यांनी सेवेचे विस्तार केला आहे.
2021 साली त्यांच्या कंपनीचे मूल्य सुमारे 4,700 कोटी इतके होते. मे 2022 मध्ये यात दुप्पट वाढ झाली. कंपनी चांगल्या प्रकारे काम करत असल्याने अनेक गुंतवणूकदारही त्यांच्याकडे आकर्षित झाले. सुमारे 1,650 कोटी रुपयांची गुंतवणूक झेप्टोमध्ये आहे.