एप्रिल महिन्यातील आगामी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे परभणी, गोंदिया, पुणे आणि नंदुरबार या जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत. परभणी आणि पुण्यातील रोजगार मेळावा हा ऑनलाईन होणार आहे. परभणीतील मेळावा 11 ते 17 एप्रिल, 2022 यादरम्यान होणार असून या मेळाव्यात खासगी उद्योजक येणार आहेत. तर गोंदिया जिह्ल्यातील मेळावा 11 ते 19 एप्रिल, 2022 मध्ये होणार आहे. पुण्यात 20 एप्रिलला मोरवाड आयटीआय, पिंपरी इथे तर नंदुरबारमध्ये शासकीय आयटीआय नंदुरबार इथे 21 एप्रिलला प्रत्यक्षात मेळावा होणार आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
पूर्वीच्या रोजगार मेळावा योजनेचे नाव बदलण्यात आले आहे. ही योजना आता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या नावाने राबवली जाते. या मेळाव्यांबाबतची अधिकची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबसाईटवर मिळू शकते.
राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय या विभागातर्फे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार/स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारखानदार, व्यापारी आणि सुशिक्षित बेरोजगार यांचा एकत्रित रोजगार मेळावा जिल्ह्याच्या ठिकाणी घेतला जातो. लघु व मध्यम उदोयजक, दुकानदार, कारखानदार, हॉटेल व्यावसायिक यांना कुशल कामगारांची सतत गरज भासते. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करून बाजारातील कौशल्याधारित कामगारांची मागणी आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
यापूर्वी राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारतर्फे मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, महाबळेश्वर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, नागपूर, अमरावती या ठिकाणी नियमित रोजगार मेळावे आयोजित केले जातात. वर्षभरात या प्रत्येक ठिकाणी किमान 4 रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. या रोजगार मेळावा योजनेचा नाव आता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा असे करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यातून मुला-मुलींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीची संधी दिली उपलब्ध करून दिली जाते. आयटीआय, इंजिनीअरिंग, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, बँकिंग यासह अनेक शाखांतील मुलामुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. राज्य सरकारचा उद्योग विभाग आणि कौशल्य विकास व रोजगार विभाग यात प्रामुख्याने सहभागी असतो.
या योजनेव्यतिरिक्त सरकारतर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना आर्थिक बळकटी देणे, आदिवासींसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे, व्यवसाय मार्गदर्शन करणे, व्यवसाय उभारणीकरीता आर्थिक महामंडळाकडून भांडवल मिळवून देणे आदी योजना राबविल्या जातात.