जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services) लिस्टेड होण्यासाठी आता रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) प्रयत्न करत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता जोरदार तयारी सुरू केलीय. रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची यादी तयार करणार आहे. यंदाच्या दिवाळीच्या आधीच म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात रिलायन्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजअंतर्गत जिओ सर्व्हिस ही एक टेलिकॉम ऑपरेटर (Telecom operator) आणि रिटेल कंपनी आहे. जिओ ही देशातली टेलिकॉम क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी मानली जाते.
Table of contents [Show]
आयपीओची जोरदार तयारी
टेलिकॉमध्ये तर यश मिळालं आहेच. आता कंपनीचं लक्ष्य आर्थिक क्षेत्रावरही असणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असल्याचा अंदाज आहे. तरीदेखील बाजार मूल्यांकनानुसार ही एक देशातील 5वी सर्वात मोठी बँक बनू शकते. त्या धर्तीवर आयपीओची जोरदार तयारी सुरू झालीय. सुत्रांकडून याबाबत खात्रीशीर माहिती दिली जातेय. टाइम्स ऑफ इंडियानंही यासंबंधीचं वृत्त दिलंय.
ऑक्टोबरपर्यंत लिस्टेड?
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी ऑक्टोबरपर्यंत लिस्टेड होण्याची शक्यता आहे. ही माहिती केवळ सुत्रांच्या आधारावर आहे. असंही सांगितलं जातंय, की रिलायन्स इंडस्ट्रीज याच संदर्भात 2 मेला भागधारक तसंच कर्जदारांसोबत बैठक घेऊ शकतं. आपली फायनान्स कंपनी लिस्ट करण्याच्या निर्णयावर यावेळी मतदान होण्याचा अंदाज आहे. आपल्या लिस्टेडसंदर्भात मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी सूचीशी संबंधित मंजुरीसाठी कंपनी सतत नियामकांच्या संपर्कात असते, असंही सांगितलं जातंय.
2019मध्ये केली होती घोषणा
साधारणपणे पाच ते सहा महिन्यांपर्यंत म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत कंपनी लिस्टिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल. ही प्रक्रिया वेळेत झाली तर रिलायन्स इंडस्ट्रीज त्यासाठी आयपीओ लॉन्च करेल, अशी शक्यता आहे. मात्र, आता केवळ चर्चा असल्याचं बोललं जातंय. ही सर्व माहिती अंदाजांवर आधारित आहे. या सर्व प्रक्रियेत बदलही होऊ शकतो. यासंबंधी थोडं मागे गेल्यास आपल्यालाही अंदाज येईल. साधारण 2019मध्ये अशी घोषणा करण्यात आली होती, की रिलायन्स इंडस्ट्रीज पुढच्या पाच वर्षांत शेअर बाजारात आपला किरकोळ व्यवसाय तसंच जिओ प्लॅटफॉर्म लिस्टेड करणार.
टेक्नॉलॉजीवर आधारित कंपनी
डिजीटल फायनान्शिअल सर्व्हिसेस हा याचा मूळ उद्देश आहे. टेक्नॉलॉजीवर आधारित अशी ही कंपनी आहे. यासंदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही भाष्य केलं होतं. मागच्या वर्षी केलेल्या एक निवेदनात ते म्हणाले होते, की ही एक तंत्रज्ञानावर आधारित कंपनी असणार आहे. यामार्फत देशातल्या जनतेला डिजीटल आर्थिक सेवा दिली जाईल. रिलायन्स ग्रुपच्या देशाच्या विविध भागांत पसरलेल्या ग्राहक व्यवसायाला याचा फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.
17,225 स्टोअर्सचं नेटवर्क
रिलायन्स ग्रुपच्या रिटेल कंपनीचं देशभरात साधारणपणे 17,225 स्टोअर्सचं नेटवर्क आहे. 200 दशलक्षाहून अधिक लोक याठिकाणी दर महिन्याला येत असतात. याशिवाय, कंपनीनं नुकतेच मेट्रो कॅश अँड कॅरीची सुविधा सुरू केलीय. घाऊक बाजारात ही सुविधा काम करते. यात लाखो लहान दुकानदारांचा डेटा आहे. दरम्यान, रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 426 दशलक्ष इतकी आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services) ही 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांची कंपनी असू शकते. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेनंतर ही देशातली सर्वात मोठी खासगी क्षेत्रातली कंपनी ठरणार आहे.