जेट एअरवेज ही एकेकाळची देशातली एक मोठी विमान कंपनी तीन वर्षं झाली बंद आहे. आणि ती पुन्हा सुरू करण्याचे निकराचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पण, त्यातच कंपनीला एक धक्का बसलाय. कारण, कंपनीतले कित्येक वरिष्ठ पदावरचे व्यवस्थापकीय लोक, अनुभवी पायलट आणि केबिन क्रूही कंपनी सोडून चालले आहेत.
जेट एअरवेज पुन्हा कधी सुरू होणार याविषयीची अनिश्चितता वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं अंतर्गत वर्तुळात बोललं जातंय. डिसेंबर महिन्यातच अभियांत्रिकी आणि मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुखांनी कंपनी सोडली.
तर जेट एअरवेजचे उपाध्यक्ष मार्क टर्नर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर आणि मुख्य वित्त अधिकारी विपुल गुणतिलका यांचा पगार कमी करण्यात आला आहे. तर इतर कर्मचारी वर्गामध्ये पायलट आणि केबिन क्रू ने स्वत:हून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आर्थिक अडचणींमुळे ज्यांचा पगार कमी झाला किंवा ज्यांना पगाराविना सुटीचा पर्याय देण्यात आला, अशा अनेकांनी काही वर्षं वाट बघून अखेर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलाय.
जेट एअरवेजने गेल्या महिन्यात काही कर्मचाऱ्यांचा 50% च्या आसपास पगार कमी केला होता. तर काही जणांना पगाराशिवाय पगाराशिवाय सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. त्यानंतर कंपनीत ही हालचाल सुरू झाली आहे. खरंतर जेट एअरवेजला पुन्हा रनवेवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यासाठी एका फंडिंग गटाबरोबर कंपनीचे प्रयत्नही सुरू झाले होते. पण, नोव्हेंबर महिन्यात अचानक या प्रयत्नांना खिळ बसली. जेटच्या जुन्या कर्मचाऱ्यांना द्यायचं निवृत्ती वेतन आणि इतर थकलेले भत्ते द्यायला या फंडिंग गटाने नकार दिला.
या परिस्थितीमुळे जेट एअरवेज पुन्हा कधी पंख पसरेल याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. आणि त्यातून कर्मचारी वर्ग सोडून जाण्याचं प्रमाण वाढलंय.