Jeevan Kiran Life Insurance Policy: एलआयसीच्या जीवन किरण पॉलिसी योजनेमध्ये इतर पॉलिसींच्या तुलनेत काही बदल करण्यात आले आहे. यामध्ये धूम्रपान करणाऱ्या आणि न करणाऱ्या ग्राहकांकरीता वेगवेगळे नियम आखून दिले आहेत. तसेच जीवन किरण पॉलिसी अंतर्गत बचत आणि जीवन विमा योजनेत दिले जाणारे सर्व लाभ पॉलिसीधारकाला दिले जाणार आहे.
या प्रकारे भरु शकता प्रीमियम
या पॉलिसीची कमीत कमी भरावी लागणारी मूळ विमा रक्कम 15,00,000 रुपये एवढी आहे. तर अधिका अधिक भराव्या लागणाऱ्या मूळ विमा रक्कमेवर कुठलिही मर्यादा नाही. या पॉलिसीचा किमान मुदत काळ 10 वर्ष आणि कमाल मुदत काळ 40 वर्षांचा आहे. महत्वाची बाब म्हणजे या पॉलिसी अंतर्गत भराव्या लागणारे प्रीमियम तुम्ही अगदी लवचिक पद्धतीने भरु शकता. जसे की, तुम्हाला प्रीमियम एक रकमी म्हणजेच सिंगल प्रीमियम भरायचा असेल, तर तुम्ही तो भरुन सुध्दा पॉलिसी घेऊ शकता. तसेच तुम्ही एक महिन्यात, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी आणि वार्षिक पध्दतीने देखील प्रीमियम भरु शकता.
वयोमर्यादा आणि अटी
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या पॉलिसीअंतर्गत गृहिणी आणि गर्भवती महिलेकरीता कुठलाही लाभ देण्यात आलेला नाही, त्यामुळे ही योजना त्यांच्या करीता नाही. तसेच कोविड लसीचे महत्व देखील या पॉलिसीमध्ये लागू करण्यात आले आहे. पॉलिसीधारकाला ही पॉलिसी घेण्यापूर्वी लसीकरण करणे आवश्यक आहे. पॉलिसीधारकाचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 65 वर्ष असे आहे.
लाभ मिळण्याचे नियम
जीवन किरण पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला नियमित प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत वार्षिक प्रीमियमच्या 7 पट रक्कम दिल्या जाईल. तसेच विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास देखील कुटुंबाला नियमानुसार आर्थिक मदत दिल्या जाते. या पॉलिसीचा मॅच्युरिटी काळ पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी होल्डरला एकूण जमा असलेली प्रीमियम रक्कम एकाच वेळी दिली जाईल. या योजनेत पॉलिसी घेतलेल्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होईपर्यंत केलेली आत्महत्या वगळता आकस्मात मृत्यू गटात मोडणाऱ्या सर्व प्रकारच्या मृत्यूला कव्हरेज दिले जाते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            