हल्ली नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून येते. पण नेमका कोणता व्यवसाय करायचा याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. ग्राहकांच्या गरजा आणि बाजापेठेतील मागणी लक्षात घेऊन व्यवसाय केला, तर जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे व्यवसायाची उभारणी करताना त्याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या ब्रेडला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. महत्त्वाचे म्हणजे ब्रेडपासून अनेक खाद्यपदार्थ काही मिनिटात तयार होतात. त्यामुळे या व्यवसायात घेतलेली मेहनत तुम्हाला चांगलाच नफा मिळवून देऊ शकते. हा व्यवसाय उभारण्यासाठी तुम्हाला एका जागेची गरज लागू शकते. त्या सोबतच वेगवेगळ्या मशीन्स, विजेचे कनेक्शन, भांडवल आणि काही कर्मचाऱ्यांची गरज लागू शकते.
Table of contents [Show]
व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करा
कोणत्याही व्यवसायाचे रजिस्ट्रेशन (Registration) करणे गरजेचे आहे. हे रजिस्ट्रेशन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये असू शकते. जसे की, प्रोपरायटरशिप, पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. याशिवाय तुम्हाला ट्रेड लायसन्सची आवश्यकता लागू शकते. हे लायसन्स काढण्यासाठी जवळच्या सरकारी विभागातून किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयातून माहिती मिळू शकते. ब्रेड हा एक प्रकारचा खाद्यपदार्थ आहे. कोणत्याही खाद्यपदार्था संदर्भात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यावसायिकाकडे त्याचे अधिकृत लायसन असणे गरजेचे आहे. हे लायसन ऑनलाईन देखील काढू येते. यासाठी FSSAI (Food Safety and Standards Authority of India) या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याशिवाय तुम्ही मोठ्या आणि व्यावसायिक स्तरावर हा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर GST रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे.
कोणत्या सामग्रीची आवश्यकता लागते?
ब्रेडचा व्यवसाय करण्यासाठी कच्चा माल म्हणून मैदा, गव्हाचे पीठ,मीठ, साखर, मिल्क पावडर, तेल इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी नजीकच्या किराणा स्टोअरमधून खरेदी करता येऊ शकतात. तसेच ब्रेड तयार करण्यासाठी किमान 3 - 4 प्रकारच्या मशीनची गरज लागते. ही मशीन तुम्ही तुमच्या कपॅसिटीनुसार विकत घेऊ शकता. साधारण या मशीनची किंमत किमान 10 हजार रुपयांपासून ते जवळपास 75 हजार रुपयांच्या आसपास असते.
‘कमर्शिअल ओव्हन’ या मशीनचा उपयोग पाव भाजण्यासाठी केला जातो. पूर्वी पाव भट्टीत भाजले जायचे. आता या मशीन इलेक्ट्रिक आणि गॅस स्वरुपात उपलब्ध झाल्या आहेत. या मशीनची किंमत अंदाजे 75 हजारापर्यंत आहे. त्यानंतर पाव कापण्यासाठी ‘स्लायसिंग मशीन’चा वापर केला जातो. या मशीनच्या मदतीने कमीतकमी वेळेत पाव समान आकारात कापता येतात. ही मशीन 20 हजारांपर्यंत मिळू शकते. त्यानंतर ‘वजन काटा’ हा ही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. बाजारात मिळणाऱ्या व्यावसायिक वजन काट्याची किंमत 1 हजारापासून 10 हजारापर्यंत आहे. त्याचबरोबर ब्रेड बनवण्याचा व्यवसाय व्यावसायिक स्तरावर करायचा असेल, तर यासाठी काही कामगारांची मदत लागू शकते किंवा घरातील सदस्यांची मदत घेऊनही सुरूवात करता येऊ शकते.
ब्रेड पॅकेजिंगचा खर्च किती?
ब्रेड पॅक करण्यासाठी ब्रॅण्डिंगनुसार पॅकेजिंग मटेरिअल वापरावे लागेल. यामुळे उत्पादनाचे ब्रॅण्डिंगही होते आणि ते दिसायला आकर्षक ही असेल. एक पॅकेजिंग बॅग साधारण 1 ते 2 रुपयात ब्रॅण्डिंगच्या नावासह प्रिंट करून मिळेल. मोठ्या क्वांटिटीमध्ये पॅकेजिंग मटेरियल तयार करून घेतले तर ते स्वस्तात मिळू शकेल.
प्रशिक्षणाचा खर्च किती?
एखाद्याला या व्यावसायातील बारकावे समजून घ्यायचे असेल तर त्याला बेकरी प्रोडक्ट्सचे प्रशिक्षणही घेता येऊ शकेल. त्या प्रशिक्षणात फक्त ब्रेड नाही, तर इतर बेकरी प्रोडक्ट कसे तयार करतात हे देखील शिकवले जाते. याची फी साधारणतः 2,500 पासून ते 10,000 रुपयांपर्यंत फी असते. याचे प्रशिक्षण घेतल्याने तुम्ही तुमच्या कामगारांना देखील मार्गदर्शन करू शकता.
गुंतवणूक किती करावी लागेल?
ब्रेड बनवण्याचा हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करण्यासाठी किमान 5 ते 6 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्यासोबतच 500 ते 800 स्केवर फुटाच्या जागेची आवश्यकता असेल. या जागेत कच्चा माल, पक्का माल आणि मशीन्स ठेवता येतील. यासाठी पंतप्रधान मुद्रा (PM Mudra Scheme) योजनेतून कर्ज स्वरूपात आर्थिक मदत मिळू शकते.
ब्रेड हा लोकांच्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ बनला आहे. ही संधी लक्षात घेता, 60 रुपयात 2 किलो ब्रेड तयार केला जाऊ शकतो. तसेच 500 ग्रॅमच्या ब्रेडचे एक पॅकेट विक्रीसाठी होलसेल दराने 25 रुपयांना विकले जाऊ शकते. अशाप्रकारे सुरुवातीला लोकल मार्केटवर फोकस करून व्यवसायाचा विस्तार करता येऊ शकतो.