Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुमचा भारतातील इन्शुरन्स परदेशातील युद्धजन्य स्थितीसाठी पुरेसा आहे का?

insurance for war situation in abroad

अचानक उद्भवणाऱ्या युद्धासारख्या आपत्कालीन स्थितीसाठी आपण घेतलेला लाईफ कव्हर “Equipped” आहे काय? याची माहिती पॉलिसीधारकाने करून घेणे गरजेचे आहे; कारण अपघात सांगून घडत नसतात.

“युद्धस्य तु कथा रम्या” अर्थात युद्धाच्या कथा, बातम्या ऐकायला सुरस, रंजक वाटतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवर गेल्यावर त्याची तीव्रता, भयावहता समजते. फेब्रुवारी 2022 पासून युक्रेन-रशिया मध्ये चालू असलेल्या युद्धामुळे युद्धग्रस्त झालेल्या भागामध्ये दोन तरुण भारतीय विद्यार्थ्यांचा नाहक दुर्दैवी बळी गेला. अचानक उद्भवलेल्या युद्धासारख्या आपत्कालीन स्थितीची, अगदी वर्षभरापूर्वी त्यांच्यापैकी कुणीतरी कल्पना तरी केली असेल काय! आकस्मित घडणाऱ्या अशा घटनांसाठी आपण घेतलेले लाईफ कव्हर देखील तितकेच “Equipped” आहे काय, याची माहिती प्रत्येक पॉलिसीधारकाने करून घेणे आवश्यक ठरले आहे. कारण “अपघात सांगून घडत नसतात”. 

बहुतांश टर्म इन्शुरन्स प्लॅन्स सर्व प्रकारचे मृत्यू कव्हर करतात. अपवाद फक्त, पॉलिसीच्या पहिल्या वर्षांमध्ये पॉलिसीधारकाने केलेल्या आत्महत्येचा. तेव्हा युक्रेनसारख्या युद्धग्रस्त देशामध्ये एखाद्या पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास नॉमिनीला डेथ-क्लेमचा लाभ मिळू शकतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, हे लाईफ कव्हर सर्वच परिस्थितीमध्ये समान कार्य करेल. प्रामुख्याने प्रत्येक पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये संरक्षण लाभत असणारे मृत्यूचे प्रकार, इतर अटी आणि अपवाद (conditions and exclusions) ठळकपणे नमूद केलेले असतात. त्या नमूद केलेल्या  परीस्थितीमध्येच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, इन्शुरन्सचे संरक्षण प्रभावी राहते.  

लाईफ कव्हरचे स्वरूप आणि क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया महत्त्वाची 

परदेशी प्रवास आणि वास्तव्य आता बरेचसे कॉमन झाले आहे. सुट्टी असो वा बिझनेस टूर्स असोत, मीटिंग्ज, सेमिनार्स, एक्झिबिशन्स किंवा मेडिकल टुरिझम असो, अगदी परदेशी राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटायला देखील लोक सहज प्रवास करू लागले आहेत. त्यांपैकी विद्यार्थी, कुशल-अकुशल कामगार, सल्लागार आणि इतर अनेक लोक दीर्घकाळासाठी वास्तव्याच्या हेतूने जातात. तेव्हा एखाद्या युद्धग्रस्त देशामध्ये पॉलिसीधारकाने घेतलेले लाईफ कव्हर कोणत्या स्वरूपाचे आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे संभाव्य धोके, अपघात कव्हर केले आहेत? त्याचे परदेशात राहण्याचे स्वरूप कसे आहे? तिथे पॉलिसीधारकाच्या मृत्यूचे कारण काय आहे? अशा अनेक गोष्टींवर क्लेम-सेटलमेंट अवलंबून असते. अर्थात छोट्या प्रवासासाठी नैसर्गिक मृत्यू कुठेही आला तरी तो सहसा संरक्षित केला जातो.

इन्शुरन्स कंपनीला परदेशातील वास्तव्याची माहिती देणे आवश्यक

पॉलिसीधारकाने पॉलिसी-टर्ममध्ये त्याच्या निवासस्थानामध्ये किंवा वास्तव्यामध्ये बदल झाला असल्यास तात्काळ इन्शुरन्स कंपनीच्या तसे निदर्शनात आणून देणे, हे त्याचे कर्तव्य आहे. बऱ्याचदा पॉलिसीधारक एक भारतीय नागरिक म्हणून टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करतो, मात्र त्याच्या पॉलिसी-टर्म मध्येच त्याला नोकरी किंवा इतर कारणांमुळे परदेशात जाणे आवश्यक भाग पडते. अशा परिस्थितीत, पॉलिसीधारकानी इन्शुरन्स कंपनीला त्याच्या परदेशातील वास्तव्याबाबत किंवा तेथे स्थायिक होण्याच्या योजनेबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.

अनैसर्गिक आपत्तीतील क्लेम्स कंपन्या नाकारतात

युद्ध, आक्रमण, बंड, दंगल, लष्करी उठाव (military coup), नागरी दंगलीत (civil war) भाग घेतल्याने झालेली दुखापत यांसारख्या अनैसर्गिक आपत्तींमुळे किंवा स्कायडायव्हिंग, ट्रेकिंग, माउंटनिंग, पॅराग्लायडिंग सारख्या तुलनेने धोकादायक (risky) खेळांमधील सहभागामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बहुतांश इन्शुरन्स कंपनीज् क्लेम स्वीकारत नाहीत. काही पॉलिसीज् मध्ये स्पष्टपणे कलम (clause) नमूद केलेले असते, “मृत्यूच्या प्रकरणात युद्धाचा समावेश असल्यास टर्म प्लॅनसह घेतलेल्या वैयक्तिक अपघात संरक्षणासाठीच्या ॲड-ऑन रायडरचे  पैसे दिले जाणार नाहीत.” म्हणजेच इन्शुरर अशा वेळी केवळ टर्म प्लॅनच्या कालावधीमध्ये झालेल्या मृत्यूसाठी लाईफ-कव्हर मान्य करतो, आणि  अपघाती किंवा अपवादात्मक स्थितीमधील मृत्यूसंबंधीचा क्लेम नाकारतो.

इराक, लेबनॉन, अफगाणिस्तान, सीरिया, येमेन, इस्रायल-पॅलेस्टाईन सारखे अनेक मिडल-ईस्ट (मध्य-पूर्व देश) तसेच लिबियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये सतत युद्ध सुरू असतात. अनेक भारतीय अनिच्छेने आणि अपरिहार्यतेने अशा संकटात सापडतात. बहुतेक प्रकरणांमध्ये घरामधील एकुलती एक कमविणारी व्यक्ती जर अशा एखाद्या घटनेचा बळी ठरली, तर घरातल्या व्यक्तीच्या नसण्याने आधीच कोसळणाऱ्या कुटुंबावर येणाऱ्या आर्थिक ताणाची कल्पना न केलेलीच बरी! त्यामुळे पूर्णपणे सुसज्ज अशी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी निदान अशा अपवादात्मक प्रसंगातून सावरण्यास आर्थिक मदत देऊ शकेल.