विमा घेणं किती गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांना आता कळून चुकलं आहे. आपल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत रहावी म्हणून अनेक लोक वेगवेगळा विमा घेत असतात. आरोग्य विषयक विमा हा फक्त आरोग्याशी संबंधित काही खर्च असेल तर कामी येतो. जीवन विमा हा पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या घरच्यांना वित्तीय सहाय्य प्रदान करते. याशिवाय जीवन विम्यात परतावा देणाऱ्या देखील काही योजना विमा कंपन्यांनी आणल्या आहेत. ज्याद्वारे विमा काळात सुदैवाने पॉलिसीधारकाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागला नसेल तर त्यांना जमा केलेल्या रकमेवर चांगला परतावा देखील मिळतो.
याआधी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा विमा नागरिकांना घ्यावा लागत होता. परंतु लवकरच जीवन विमा पॉलिसी, आरोग्य विमा आणि गुंतवणुकीसाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्याची गरज भासणार नाहीये. आता या तिन्ही प्रकारचा विमा एकाच पॉलिसीमध्ये विमा कंपन्या उपलब्ध करून देणार आहेत. जीवन-आरोग्य आणि गुंतवणुकीचा पर्याय एकत्र मिळणार असल्यामुळे सामान्य नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
IRDA कडून ग्रीन सिग्नल
गेल्या एकाही वार्हन्पासून अशी कॉम्बो पॉलिसी आणण्यासाठी विमा कंपन्या प्रयत्नरत होत्या. आता मात्र विमा नियामक IRDA (Insurance Regulatory and Development Authority) यासाठी मंजुरी दिली गेली आहे. त्यामुळे विमा कंपन्या लवकरच कॉम्बो पॉलिसी बाजारात आणतील अशी अपेक्षा आहे.
IRDA ने घालून दिली मार्गदर्शक तत्वे
अशा प्रकारच्या विम्याला मंजुरी देताना Insurance Regulatory and Development Authority ने विमा कंपन्यांना काही मार्गदर्शक तत्वे देखील सांगितली आहेत. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया करूनच विमा कंपन्यांना या योजना बाजारात आणता येणार आहेत. तसेच परतावा देणाऱ्या योजनांमध्ये कर विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे असे देखील IRDA ने म्हटले आहे. सोबतच विम्याचे दावे झटपट निकाली काढण्यासाठी विमा कंपन्यांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे असे देखील मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.
प्रीमियममध्ये होऊ शकते कपात
3 इन 1 अशी कॉम्बो पॉलिसी लागू केल्याने विमा कंपन्यांचा खर्च कमी होईल, असे विमा तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे विमा कंपन्यांना पॉलिसी व्यवस्थापनाच्या खर्चासाठी पर्यायाने कमी पैसे लागणार आहेत. याचाच अर्थ विम्याच्या प्रीमियममध्ये ग्राहकांना सवलत दिली जाऊ शकते. याचा थेट फायदा हा सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार आहे.