गुरगांवमधील स्टार्टअप कंपनी ‘डेलीव्हेरी’ या लॉजिस्टिक फर्मचा मे महिन्यात आयपीओ (Initial Public Offer) येण्याची शक्यता आहे. बाजारातील अनिश्चित वातावरणामुळे कंपनीने यापूर्वी नियोजित केलेल्या 7,460 कोटी रुपयांच्या इश्यूचा आकार कमी करून 5,500 कोटी रुपये केला जाऊ शकतो, अशी शक्यता शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
डेलीव्हेरी कंपनीची शनिवारी दि. 30 मे रोजी मे महिन्यात आयपीओ आणावा की नाही, याबाबत कंपनी बोर्डाची बैठक झाली. कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये आयपीओ योजनेला मंजुरी देण्यात आली असून, देशातील सर्वांत मोठा आयपीओ असलेल्या एलआयसीच्या आरंभानंतर डेलीव्हेरी कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. दिल्लीव्हेरीचा आयपीओ जानेवारीमध्ये सेबीने (SEBI) मंजूर केला होता. पण बाजारातील अस्थिरतेमुळे कंपनीला आयपीओची तारीख पुढे ढकलावी लागली होती.
डेलीव्हेरी ही एक स्टार्टअप कंपनी असली तरी त्याची खूप कमी दिवसांत चांगली प्रगती झाली आहे. 2021 रोजी झालेल्या इकॉनॉमिक टीम्स स्टार्टअप अवॉर्ड्स कार्यक्रमात डेलीव्हेरी कंपनीचे सहसंस्थापक (co-founder) आणि सीईओ (chief executive officer) साहिल बरूआ यांनी सांगितले होते की, आम्हाला डेलीव्हेरीचा बाजारात चांगला जम बसल्यावरच सार्वजनिक व्हायचे आहे. आम्हाला सध्या भांडवलाची इतकी गरज नाही आणि बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे.
डेलीव्हेरीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, कंपनीच्या भागधारकांमध्ये सॉफ्टबॅंक 22.78 टक्के, नेक्सस व्हेंचर्स 9.23 टक्के आणि सीआय स्विफ्ट होल्डिंग्सचा 7.42 टक्के वाटा आहे. याव्यतिरिक्त कपिल भारती 1.11 टक्के, मोहित टंडन 1.88 टक्के आणि सूरज सहारन यांचा कंपनीत 1.79 टक्के हिस्सा आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            