न्यूजेन सॉफ्टवेअर (Newgen spftware)... एका स्मॉलकॅप (Small cap) आयटी क्षेत्रातल्या कंपनीनं आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर या कंपनीचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत 57 टक्क्यांहून अधिक वाढीसह 30.2 कोटी रुपये राहिला आहे. महसुलात 34 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तो 251.7 कोटी रुपये इतका झाला आहे. एबिट्डा (EBITDA) म्हणजे व्याज कर घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई 67.2 टक्क्यांच्या वाढीसह 32.1 कोटी रुपये इतकी झाली. EBITDA मार्जिन 10.2 टक्क्यांवरून 12.8 टक्क्यांपर्यंत वाढल्याची नोंद झाली आहे. ईपीएस म्हणजेच प्रति शेअर कमाई 4.33 रुपये होती. मागच्या वर्षी ती 2.76 रुपये होती.
न्यूजेन सॉफ्टवेअर शेअर किंमत
निकालानंतर हा शेअर साडेपाच टक्क्यांच्या वाढीसह 720 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. इंट्राडेमध्ये शेअरनं 757.60 रुपयांचा नवा 52 आठवड्यांचा उच्चांक तयार केला आहे. कंपनीचं मार्केट कॅप 5000 कोटी रुपयांपेक्षा थोडं अधिक आहे. मागच्या एका आठवड्यात हा शेअर 15 टक्क्यांहून अधिक पटीनं वाढल्याचं दिसून आलं आहे. या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे तर दुप्पट झाले आहेत. तीन वर्षांचा परतावा 320 टक्के आहे. एकूणच हा मल्टीबॅगर आयटी स्टॉक आहे.
मार्च 2023 तिमाहीचा निकाल?
मार्च तिमाहीच्या कामगिरी पाहिल्यास, बीएसईवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, न्यूजेन सॉफ्टवेअरचा ऑपरेशनल रेव्हेन्यू 305 कोटी रुपये होता. पीबीटी म्हणजेच करपूर्व नफा 96.35 कोटी रुपये इतका होता. निव्वळ नफा 78.61 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. ईपीएस म्हणजे प्रति शेअर कमाई 11.29 रुपये इतकी होती.
जून 2022 तिमाहीचा निकाल?
वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतला म्हणजेच जून 2022च्या तिमाहीच्या निकालांवर नजर टाकल्यास, बीएसईच्या आकडेवारीनुसार, महसूल 187.89 कोटी रुपये इतका होता. पीबीटी म्हणजेच करपूर्व नफा 22.94 कोटी रुपये होता. निव्वळ नफा 19.17 कोटी रुपयांपर्यंत गेला होता. ईपीएस म्हणजेच प्रति शेअर कमाई 2.76 रुपये होती. आर्थिक वर्ष 2023च्या एकूण प्रदर्शनावर बोलायचं झाल्यास, निव्वळ नफा 176.26 कोटी रुपये होता. महसूल 973.97 कोटी रुपये होता. तर ईपीएस 25.32 रुपये इतका होता.