वीजमीटर बनवणारी ही कंपनी आहे जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (Genus Power Infrastructures Ltd). या कंपनीचा शेअर चर्चेत आहे. हा स्टॉक अलीकडच्या काळात मल्टीबॅगर (Multibagger) ठरला आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडच्या स्टॉकनं गेल्या तीन वर्षात 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा (Return) दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांना कंपनीनं मालामाल केलं आहे.
3 वर्षात बंपर बूम
जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडचा स्टॉक 3 वर्षांपूर्वी सुमारे 26 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. बुधवारच्या (12 जुलै) व्यवहारात एक वाजता तो फक्त 162 रुपयांच्या वर व्यवहार करत होता. अशाप्रकारे गेल्या तीन वर्षांत या शेअरची किंमत सुमारे 525 टक्क्यांनी वाढली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर गेल्या तीन वर्षांत या समभागानं 6 पटींहून अधिक वाढ दर्शविली आहे.
सतत मल्टीबॅगर परतावा
अलीकडची काही सेशन्स वगळता हा शेअर सातत्यानं फायदेशीर ठरला आहे. आजच्या व्यापारात तो सुमारे 1 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या 5 दिवसांत त्याची किंमत सुमारे 7 टक्क्यांनी घसरली. मागच्या एका महिन्यात स्टॉक 55 टक्क्यांच्या वर आहे. मागच्या 6 महिन्यांत यात 92 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षभरात या शेअरची किंमत 105 टक्क्यांहून अधिक मजबूत झाली आहे.
काय करते कंपनी?
ही कंपनी प्रामुख्यानं वीज मीटरचं उत्पादन आणि विक्री करते. कंपनी विशेष गरजेनुसार विशेष मीटरिंग सोल्यूशनदेखील तयार करते. याशिवाय जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड टर्नकी आधारावर अभियांत्रिकी, बांधकाम आणि कंत्राटी कामंदेखील करते. कंपनीला धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातूनही (Strategic investment) कमाई मिळते.