म्युच्युअल फंडातील गुंतवणुक (Mutual Fund Investment) आता एक लोकप्रिय गुंतवणूक योजना म्हणून सामान्य नागरिकांमध्ये प्रचलित होताना दिसते आहे. तुम्हांला जर या Systematic Investment Plan मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आता तुमच्यासाठी ही नामी संधी आहे. याचे कारण म्हणजे SIP मध्ये सध्या
रेकॉर्ड ब्रेक 16,000 कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. देशभरातील नागरिकांनी हा गुंतवणुकीचा स्मार्ट पर्याय निवडल्याचे यातून स्पष्ट होत आहे. सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंडातील गुंतवणुक 16,420 कोटींच्या घरात पोहोचलेली पाहायला मिळाली आहे.
SIP ला पसंती का?
Systematic Investment Plan म्हणून ओळखली जाणारी ही गुंतवणूक योजना पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक लोकप्रिय योजना बनली आहे. दरमहा ठराविक रक्कम SIP मध्ये गुंतवणूक करून बचतीची शिस्त या निमित्ताने युवा वर्गाला लागताना दिसते आहे. खरे तर शेअर (Share Market Investment) आणि एसआयपी गुंतवणूक यात फरक आहे. तुम्ही ज्या कंपनीची एसआयपी घेतली आहे त्या कंपनीचे फंड व्यवस्थापक मार्केटचा अभ्यास करून विविध क्षेत्रात पैसे गुंतवत असतात, त्यामुळे गुंतवणूकदार म्हणून मार्केट रिसर्चसाठी (Market Research) तुम्हांला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही.
शेयर मार्केटच्या तुलनेत SIP मध्ये जोखीम देखील कमी असते. तसेच परतावा देखील चांगला मिळतो. त्यामुळे भविष्यातील खर्च लक्षात घेऊन या फंडात गुंतवणूक करण्यास नागरिक उत्सुक दिसतात. गुंतवणुकीचा कालावधी जितका अधिक, तितका परतावा अधिक असे या गुंतवणुकीचे सूत्र आहे.
कधीही सुरु करता येते SIP
म्युच्युअल फंडात गुंतवणुक करण्यासाठी तुम्हांला तुमचे मासिक बजेट ठरवून घ्यावे लागेल. महिन्याला तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा खर्च भागल्यानंतर तुमच्याकडे किती रक्कम शिल्लक राहते, त्यानुसार तुम्ही मासिक गुंतवणुकीची रक्कम ठरवू शकता. मार्केटमध्ये अशाही काही म्युच्युअल फंड कंपन्या आहेत ज्या 150 रुपये मासिक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देतात. तुम्ही तुमच्या प्लॅनसह कधीही SIP सुरु करू शकता.