एलआयसी (Life Insurance Corporation) ही सरकारतर्फे चालवली जाणारी देशातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ नेहमीच विविध योजना घेऊन येत असते. या योजनांमध्ये गुंतवणूक करून मुलांचं शिक्षण, लग्न, सेवानिवृत्ती यासह विविध खर्चाचं योग्य असं नियोजन करता येवू शकतं. एलआयसीच्या विविध लोकप्रिय योजनांमध्ये एक आहे, ती म्हणजे एलआयसी न्यू जीवन आनंद पॉलिसी. एलआयसी ही पॉलिसी दीर्घकाळ चालवत होती. आता कंपनीनं या योजनेची अपडेटेड व्हर्जन सुरू केलंय.
Table of contents [Show]
लाभच लाभ
एलआयसी न्यू जीवन आनंद पॉलिसी ही एक पार्टीसिपेटिंग होल लाइफ एंडॉवमेंट योजना आहे. बचत आणि संरक्षण या दोन्हीचा लाभ गुंतवणूकदारांना यात मिळतो. हे एलआयसी जीवन आनंदचे अपडेटेड व्हर्जन आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो, ही या पॉलिसीची खास गोष्ट आहे. गुंतवणूकदाराला हमी परतावा तसंच अतिरिक्त फायदेही मिळतात. या पॉलिसी अंतर्गत, नियमित प्रीमियम पेमेंटचा पर्यायही मिळतो. पॉलिसीधारक पॉलिसी पूर्ण होईपर्यंत जिवंत राहिल्यास, त्याला मॅच्युरिटीची रक्कम मिळते. तर मृत्यू झाल्यास, नॉमिनीला देखील या रकमेचा लाभ मिळू शकतो. या पॉलिसीची खासियत म्हणजे यात 100 वर्षांसाठी पॉलिसी कव्हरचा लाभ मिळू शकतो. एबीपी लाइव्हनं याविषयीचा आढावा घेतलाय.
कोणकोणते फायदे?
न्यू जीवन आनंद पॉलिसीच्या अंतर्गत पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीवर, जिवंत राहिल्यानंतर, मृत्यू झाल्यास कुटुंबाला निश्चित अशी रक्कम मिळण्याची तरतूद आहे.
पॉलिसीच्या मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिल्यास नफ्यात वाटणीचा लाभदेखील मिळतो.
या योजनेत गुंतवणूक केल्यास करमुक्ती मिळण्यास मदत होऊ शकते.
फक्त 45 रुपयांचा हफ्ता आणि...
एलआयसीच्या या न्यू जीवन आनंद पॉलिसीद्वारे गुंतवणूकदारांना किमान 5 लाख रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. अशा स्थितीत तुम्ही या सम एश्योर्ड रकमेचा पर्याय निवडला तर तुम्हाला 35 वर्षांच्या कालावधीत एकूण 25 लाख रुपये मिळू शकतील. समजा तुम्ही 35 वर्षांचा कार्यकाळ निवडला, तर या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी 16,300 रुपये आणि मासिक आधारावर 1,358 रुपये गुंतवावे लागणार आहेत. यात आणखी एक पर्याय म्हणजे, जर आपण दररोज गुंतवणूक करण्याबद्दलचा विचार केला, तर तुम्हाला फक्त 45 रुपये गुंतवावे लागणार आहेत. त्यानंतर मॅच्युरिटीवर एकूण 25 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील.
सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी
एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ ही एक सार्वजनिक क्षेत्रातली जीवन विमा कंपनी आहे. मुंबई याठिकाणी कंपनीचं मुख्यालय आहे. एलआयसी ही देशातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे. मे 2022पर्यंत 41 ट्रिलियन म्हणजेच जवळपास 510 अब्ज डॉलरच्या व्यवस्थापनाखालची मालमत्ता असलेली सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. सर्वसामान्यांना समोर ठेवून छोट्या रकमेपासूनच्या विविध बचतीच्या योजना एलआयसीमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. जोखीम नसलेल्या, दीर्घ कालावधीच्या या योजनांवर सर्वसामान्यांचादेखील विश्वास आहे.