Isha Ambani's journey in brief: एक भारतीय उद्योजक आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सध्या सोस्यो हजूरी बेव्हरेज (Sosyo Hajoori Beverages) या कंपनीसोबत होत असलेल्या डीलमुळे चर्चेत आली आहे. ईशा अंबानीने आशियातील सर्वात मोठ्या दहा कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स रिटेल्सची (Reliance Retail ) सुत्रे नुकतीच आपल्या हातात घेतली आहेत. परंतु, रिलायन्सीची जबाबदारी घेण्यापूर्वी ईशा अंबानीचे आयुष्य कसे होते ते आपण जाणून घेऊयात.
अंबानी कुटुंबामध्ये आकाश आणि ईशा अंबानी या दोघांचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला होता. ईशाचे सुरुवातीचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. पुढे तिने सायकॉलॉजी (Psychology) विषयात अमेरिकेच्या येल विद्यापीठातून (Yale University) पदवी घेतली. नंतर, अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ बिझनेसमधून (Stanford School of Business) एमबीए केले. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या तिन्ही मुलांमध्ये ईशा अंबानीने सर्वात जास्त शिक्षण घेतले आहे.
ईशा अंबानीचा उद्योग क्षेत्रातील प्रवास (Isha Ambani's journey in business)-
ईशाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेतील मॅकिन्से अँड कंपनीमध्ये काही काळ व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले होते. अमेरिकेहून परतल्यानंतर, 2014 मध्येच त्यांचा रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला होता. डिसेंबर 2014 मध्ये, ईशा अंबानीने तिचा भाऊ आकाश अंबानीसोबत रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ 4G लाँच केले होते. 2015 मध्ये, ईशा अंबानीचा समावेश आशियातील 12 शक्तिशाली भावी व्यावसायिक महिलांच्या यादीत करण्यात आला होता.
2016 सालच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये, तिने ऑनलाइन फॅशन रिटेलर आजियो (AJIO) लाँच करून, आजियोचे फॅशन ई-कॉमर्स अॅप आणि वेबसाईट सुरू केले. आजियो ही रिलायन्स रिटेलचीच उपकंपनी आहे. यासह, रिलायन्स फाऊंडेशनचे डिजिटल एज्युकेशन प्रोग्रॅम सुरू करण्याचे श्रेयही ईशालाच जाते.
2020 मध्ये, ईशा अंबानीचा जगातील उदयोन्मुख लीडरपैकी एक म्हणून फॉर्च्युनच्या 40 अंडर 40 श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला होता. 2021 मध्ये, अमेरिकेच्या स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टच्या विश्वस्त मंडळावर ईशाची नियुक्ती झाली. या मंडळात 17 सदस्य आहेत, त्यापैकी अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश, उपाध्यक्ष, यूएस सिनेट सदस्य आहेत. मागील वर्षी मेटा आणि जियोमध्ये झालेल्या 45 हजार कोटी रुपयांच्या डीलमध्ये ईशा अंबानीचा मोठा हात होता. जुलै 2022 मध्ये ईशा रिलायन्स रिटेलचे (Reliance Retail ) संचालक (Director) पदी विराजमान झाली. रिलायन्स रिटेलचे (Reliance Retail ) बाजार भांडवल 4.40 लाख कोटी रुपये आहे.