भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. यासाठी मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून दरमहा 10000 रुपये मानधन दिले जाणार आहे. जाणून घ्या काय आहेत या इंटर्नशिपसाठीचे निकष आणि अर्ज प्रक्रिया..
6 महिन्यासाठी मंत्रालयात काम करण्याची संधी
जलशक्ती मंत्रालयाच्या नदी विकास आणि जलसंपदा विभागाकडून जनसंपर्क, पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपसाठी प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. या प्रोग्रामचा उद्देश केंद्रीय जलसंपदा विभागाकडून सुरू असेलल्या विविध कामांना प्रसिद्धी देणे, माध्यमांशी संपर्क तसेच जलसंपदा विभागाच्या कामकाजाची ओळख करून देणे आहे. या माध्यमातून शासनाच्या कामकाजाच्या माहितीस प्रसिद्धी देण्यात येणार आहे. हा इंटर्नशिप प्रोग्राम 3 ते 6 महिने कालावधीसाठी आहे.
इंटर्न विद्यार्थ्यांना दरमहा 10000 मानधन
केंद्रीय जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 10000 रुपये मानधन दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयाच्या विविध विभागामध्ये काम करायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या कामकाजाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. यासाठी मास कम्युनिकेशन/पत्रकारितेत बीए/एमए.एमबीए (मार्केटिंग) (मास कम्युनिकेशन पत्रकारितेत पदवी) चे शिक्षण घेत आहेत किंवा पदवी शिक्षण पूर्ण केले आहे, असे विद्यार्थी अर्ज करू शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या https://jalshakti-dowr.gov.in वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15.09.2023 पर्यत आहे. तर इंटर्नशिप प्रोग्राम 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे.