International Women’s Day 2023: जीवन विमा आणि आरोग्य विमा ही प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. भारतामध्ये विमा कवच घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: कोरोनानंतर तर विमा सुरक्षा घेणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागातही वाढत आहे. मात्र, असे असतानाही पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे विमा संरक्षण फार कमी आहे. ज्या काही महिलांकडे विमा आहे, त्यातील मोठ्या प्रमाणात महिला नोकरदार आहेत. तसेच त्यातील बहुतांश महिला उच्च मध्यमवर्ग आणि श्रीमंत वर्गातील आहेत.
भारतामध्ये ज्या महिला नोकरी करत नाहीत, किंवा फक्त घरकाम किंवा शेती करतात त्या विम्यापासून अद्यापही लांब आहेत. विमा फक्त कमावत्या व्यक्तीसाठी गरजेचा आहे, अशी धारणा निर्माण झाली आहे. मात्र, हे साफ चुकीचे आहे. तसेच ज्या महिलांकडे विमा आहे, ती एकतर कुटुंब प्रमुख या नात्याने पती किंवा महिलेच्या वडीलांनी पॉलिसी घेतलेली असते. मात्र, विमा घेताना महिलांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यावर कोणाचेही लक्ष जात नाही. त्यामुळे घेतलेले विमा संरक्षणही फायद्याचे ठरत नाही. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा केला जात आहे. या दिवशी महिलांची विम्याबाबत जागृती वाढवूया.
भारतामध्ये अद्यापही आर्थिक निर्णय आणि पैशांचे व्यवहार पुरुषांकडून मोठ्या प्रमाणात हाताळले जातात. त्यामुळे महिलांना त्यांच्यासाठी निर्णय घेण्याची संधीच मिळत नाही. विम्याच्या बाबतीतही तेच होते. नोकरदार महिलाही आता कुटुंबाच्या खर्चाचा भार उचलत आहेत. मुलांचा खर्च, पालकांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावरही आहे. महिलांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना तसेच स्वत: महिलेला सुरक्षित करण्यासाठी इन्शुरन्सबाबतची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पॉलिसीची पुरेशी माहिती नसणे (Lack of Insurance policy knowledge)
विमा खरेदी करताना कंपनी प्रतिनिधीकडून बऱ्याच वेळा पुरेशी माहिती दिली जात नाही. पॉलिसीमधील अटी नियम याची माहिती नसल्याने पुढे जाऊन क्लेम नाकारला जाण्याची शक्यता वाढते. पुरुषांपेक्षा महिलांना जीवन विमा काढताना प्रिमियम तुलनेने कमी भरावा लागतो, याची साधी माहितीही विमा प्रतिनिधींकडून दिली जात नाही. विमा आणि परतावा दोन्ही मिळणाऱ्या पॉलिसीमध्ये महिलांना परतावा जास्त मिळतो, हे सुद्धा महिलांना माहिती नसते. याबाबतची माहिती महिलांपर्यंत पोहचली पाहिजे.
इतर देशांशी तुलना करता भारतामध्ये विमा कवच घेण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेने कमी आहे. किती प्रकारच्या विमा पॉलिसी बाजारात उपलब्ध आहेत, हे सुद्धा अनेक महिलांना माहित नाही. त्यामुळे विमा घेताना महिला घरातील पुरुष सदस्यावर किंवा विमा प्रतिनिधीवर विश्वास ठेवून पॉलिसी खरेदी करतात.
महिलांसाठीच्या इन्शुरन्स गरजा (Women's specific needs from Insurance)
महिलांमधील आरोग्याच्या समस्या पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे विमा घेताना महिलांच्या गरजा ओळखून विमा कवच घेणे फायद्याचे ठरेल. उदाहरणार्थ, महिलांना स्तनाचा कर्करोग, सर्व्हायकल कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस हे आजार जडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या धोक्यांसाठी त्यांच्याकडे अॅडऑन कव्हर असायला हवा.
महिलांचा टर्म इन्शुरन्स घेताना त्यामध्ये या धोक्यांसाठी क्रिटिकल इलनेस रायडर फायद्याचा ठरेल. तसेच आरोग्य विमा घेताना स्पेशल कॅन्सर कव्हरही दीर्घकाळात फायद्याचे ठरेल. प्रिव्हेटिंव्ह केअर म्हणजेच एखादा आजार होण्याआधी पूर्व निदान चाचणी महिलांसाठी अत्यंत गरजेची आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून फक्त कुटुंबातील पुरुष सदस्यासाठी हेल्थ चेकअपची सुविधा दिली जाते. ती सुविधा महिला सदस्यांसाठीही असायला हवी.
काही विमा पॉलिसी मॅटरनिटी कव्हर, कॉन्ट्रासेप्शन आणि स्तनांचा कर्करोग यांसारख्या गोष्टींना विमा संरक्षण देत नाही. त्यामुळे या पॉलिसी घेणे महिलांनी टाळायला हवे. काही विमा कंपन्या महिलांसाठी खास विमा पॉलिसी घेऊन येतात. त्यामध्ये महिलांना होणारे आजार प्रामुख्याने कव्हर केलेले असतात. अशा पॉलिसी महिलांना फायद्याच्या ठरतील.
MWP अॅक्ट बाबत माहिती नसणे (Insurance Under MWP act)
जीवन विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स पॉलिसी जर महिला काढत असेल तर ती Married Women's Property Act (MWP Act) अंतर्गत पॉलिसी काढू शकते. याचा फायदा असा की, जर पॉलिसीधारक महिलेचा मृत्यू झाला तर त्यातून मिळणारे पैसे फक्त तिच्या मुलांवर वापरण्याचे संरक्षण मिळेल. म्हणजेच कुटुंबियांचे कर्ज, होम लोन किंवा इतर सदस्यांना ते पैसे वापरता येणार नाहीत. फक्त महिलेने दिलेल्या वारसदार मुलांना ते पैसे वापरता येतील. मात्र, याबाबत भारतीय महिलांमध्ये जनजागृती नाही.
क्लेम मिळवताना अडचणी (Insurance Claim problem for women's)
विमा काढल्यानंतर खरी गरज पडते ती आपत्ती आल्यानंतर. मात्र, जर विम्याचा क्लेम कसा मिळवायचा याची माहिती नसेल तर पंचाईत होऊ शकते. अनेक वेळा विमा कंपन्यांकडून क्लेम नाकरलाही जातो. अशा परिस्थितीत काय करावे, याची माहिती नसते. जर क्लेम नाकारला गेला तर दाद मागण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. IRDAI कडेही तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. महिलांनी क्लेम नाकारल्यानंतर काय पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आधीच घेऊन ठेवायला हवी. अन्यथा ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
त्यामुळे महिलांनी विमा काढताना पॉलिसीची आधी सर्व माहिती घ्यायला हवी. इंटरनेटवर अशा अनेक विमा एग्रीगेटर कंपन्या आहेत ज्यांच्या साईटवर जाऊन पॉलिसीची फिचर्स पाहता येतील. पॉलिसींची तुलना करून योग्य पॉलिसी खरेदी करणे कधीही योग्य राहील.