Nagpur 228 Core Project Approved: नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने अमरावती रोड वरील तीन गावांच्या परिसरात एक हजार एकर जमीन लॉजिस्टिक झोन म्हणून राखीव ठेवली आहे. याच परिसरात लॉजिस्टिक झोन उभारला जाण्याची शक्यता आहे. या हबमध्ये वेअर हाऊससह मल्टिमॉडेल पार्क उभारले जावू शकतात. विदर्भातील कारखान्यांमध्ये उत्पादित केला जाणारा माल येथे साठविला जाण्याची शक्यता आहे. परंतु आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र येथे उभारले जाणार नसून, ते नागपूर कृषी महाविद्यालयातच्या दाभा येथील 32 हेक्टर जागेवर उभारण्यात येणार आहे.
कशी असणार रचना?
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत नागपूर येथे हे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सभागृह, हजारोंच्या संख्येने आसन क्षमता असलेले सभागृह, इनडोअर अॅग्रीकल्चर म्युझियम, शेतकरी वसतिगृह, मनोरंजनाचे केंद्र, आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञांचे मार्गदर्शनात्मक मॉडेल,इत्यादी प्रकारच्या विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
अर्थसंकल्पात घोषणा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संस्थापक प्रकाश कडू यांनी या केंद्राचा प्रस्ताव तयार केला होता. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात हे केंद्र उभारण्याबाबत घोषणा केली होती. यासाठी आता राज्याच्या मंत्रीमंडळाने 228 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे.
कृषीमाल आणि रोजगार निर्मितीस फायदेशीर
या आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कृषी संदर्भातील अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. तर समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून कृषी माल जलद गतीने मुंबईपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या माध्यमातून विदर्भातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.