भारतात ऑटोमोबाईल क्षेत्राचा मोठा विस्तार झाला असून वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीच्या वाहन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऑगस्टमध्ये सर्वाधिक प्रवासी वाहतुकीच्या वाहनांच्या विक्रीमध्ये(Passenger vehicle sales) सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. ऑगस्ट 2023 झालेली प्रवासी वाहनांची विक्री ही अंदाजे 3.59 लाख युनिट्स इतकी आहे. जी ऑगस्ट 2022 च्या तुलनेत 9.40 टक्क्यांनी लक्षणीय वाढ दर्शवत आहे.
तीन चाकी प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ
भारतात सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेसोबत खासगी प्रवासी वाहनांने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023 मध्ये भारतात प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. SIAM च्या अहवालानुसार ऑगस्ट 2022 मध्ये 3,28,376 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. मात्र, यंदा त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून या वर्षभरात ऑगस्टमधील वाहन व्रिकीने उच्चांक गाठला आहे. महिन्यांची आकडेवारी पाहिली असता ऑगस्ट 2023 मध्ये एकूण 3,59,228 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. जी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या तुलनेत सर्वाधिक आहे.
दुचाकीच्या विक्रीत किरकोळ वाढ
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या माहितीनुसार ऑगस्ट 2023 मध्ये प्रवासी वाहने आणि तीन चाकी वाहनांची विक्री ही आत्तापर्यंतची सर्वाधिक विक्री म्हणून नोंद झाली आहे. यामध्ये तीन चाकी श्रेणीतील वाहनांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये 64,763 युनिट्स तीन चाकी वाहनांची विक्री झाली आहे. जी मागील वर्षी ऑगस्टमध्ये 38,369 इतकी झाली होती. दुचाकी वाहनांच्या विक्रीच्या संख्येत किरकोळ वाढीची नोंद झाली असून ऑगस्ट 2023 मध्ये 15,66,594 युनिट्सची विक्री झाली आहे. तर ऑगस्ट 2022 मध्ये 15,57,429 युनिट्स विक्री झाली होती.