रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट बघत असताना तुम्ही महाराजा एक्सप्रेस नावाची एक रेल्वे वेगाने निघून जाताना बघितलीही असेल. बाहेरूनही दिसणारं या गाडीचं वैभवही तुम्ही पाहिलं असेल. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल ही रेल्वे गाडी नेमकी कशासाठी आणि कुणासाठी आहे?
नाही! ही गाडी काही फक्त जुने संस्थानिक किंवा त्यांच्या माणसांसाठी नाहीए. सर्वसामान्यांसाठीच आहे. पण, तिचं भाडं मात्र सर्वसामान्यांना परवडणारं नाहीए. तिकिटांच्या दरावरूनच या ट्रेनला देशातली सर्वात महागडी ट्रेन असल्याचा लौकिक मिळाला आहे. या सुविधा आणि त्यासाठी आकारण्यात येणारं भाडं समजून घेऊया.
विशेष म्हणजे ही रेल्वे एखाद्या फिरत्या 5 स्टार हॉटेलसारखी आहे.याठिकाणी मिळणाऱ्या सुविधाही तितक्याच पंचतारांकित आहेत. त्यामुळे तुम्हालाही या रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर त्यामध्ये मिळणाऱ्या सुविधा, भाडे, तिचा मार्ग आणि तिचं बुकिंग कुठे करायचं या संदर्भातील माहिती जाणून घ्या.
Table of contents [Show]
महाराजा एक्सप्रेस - देशातील सर्वात महागडी रेल्वे
देशातील सर्वात महागडी रेल्वे म्हणून ओळखली जाणारी 'महाराजा एक्सप्रेस (Maharaja Express)' इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC - Indian Railways Catering and Tourism Corporation) मार्फत चालवली जाते. या लक्झरी रेल्वेची सेवा मार्च 2010 मध्ये सुरु करण्यात आली.
सुरुवातीला IRCTC आणि Cox and Kings India Ltd. यांनी मिळून महाराजा एक्स्प्रेसच्या कामकाजावर आणि व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्यासाठी Royal Indian Rail Tours Ltd. (RIRTL) ची स्थापना करून संयुक्त उपक्रमात तिचा समावेश केला. मात्र 12 ऑगस्ट 2011 नंतर ही रेल्वे केवळ IRCTC द्वारे चालवण्यात येऊ लागली.
महाराजा एक्सप्रेस 'या' मार्गावर धावते
महाराजा एक्सप्रेस या रेल्वेमध्ये मिळणार्या सुविधाही अगदी राजेशाही थाटातील आहेत. ही रेल्वे चक्क आतून एखाद्या आलिशान महालासारखी दिसते. 7 दिवस चार वेगवेगळ्या मार्गांवर मोठ्या थाटात ही रेल्वे धावत असते. यामध्ये 'द हेरिटेज ऑफ इंडिया', 'ट्रेझर्स ऑफ इंडिया', 'द इंडियन पॅनोरमा' आणि 'द इंडियन स्प्लेंडर' या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.
हे मार्ग नेमके कोणत्या शहराला जोडले जातात? हे जाणून घेण्यासाठी खाली तक्ता तुम्ही पाहू शकता.
'या' पंचतारांकित सुविधा ही मिळतात
या रेल्वेमध्ये आलिशान हॉटेलसारख्या सुविधा व राजेशाही व्यवस्था पाहायला मिळते.
डायनिंग कार: या रेल्वेमध्ये रंग महाल आणि मयूर महालमध्ये प्रवाशांना वेगवेगळ्या चवीचे आणि उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. प्रादेशिक ते जागतिक खाद्यपदार्थ याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात. एकावेळी 40 ते 42 लोक आरामात बसतील असा राजेशाही थाट आणि आसनव्यवस्था तुम्हाला पाहायला मिळेल.
बार: खानपाना व्यतिरिक्त या गाडीत एक बारही उपलब्ध करून दिला आहे. जगभरातील नाविन्यपूर्ण ब्रॅण्डच्या वाईन्स, कॉकटेल इ. गोष्टींचा प्रवाशांना याठिकाणी अनुभव घेता येणार आहे.
लाउंज: आराम करण्यासाठी एन-सूट बारसह राजा क्लब गेम टेबल्स आणि क्लब आर्म-चेअर्सने सुसज्ज लाउंज देण्यात आला आहे. याठिकाणी प्रवासी वेगवेगळे गेम्स खेळू शकतात आणि आराम देखील करू शकतात.
बेडरूम केबिन: महाराजा एक्स्प्रेसमध्ये 14 प्रवासी केबिन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 5 डिलक्स केबिन, 6 ज्युनियर स्वीट, 2 स्वीट आणि एक भव्य प्रेसिडेंशियल सूट देण्यात आली आहे. सर्व केबिन्स या एकतर ट्विन बेड किंवा डबल बेडसह उपलब्ध करून दिल्या आहेत. या रूममध्ये फोन, एलसीडी टीव्ही, डीव्हीडी प्लेयर्स, इंटरनेट, तापमान नियंत्रण करण्यासाठी यंत्र आणि शॉवरसह एन-सूट बाथरूम देखील दिले आहे.
इतर सुविधा: रेल्वेमध्ये चढलात की, हाय-स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुमचे सामान गाडीत चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी कुली नेमण्यात आले आहेत. याशिवाय ऑफ-ट्रेन सहली दरम्यान, तुमच्यासोबत व्यावसायिक इंग्रजी बोलणारे मार्गदर्शक असतील. प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या मार्गदर्शकाची आवश्यकता असल्यास, तशी कल्पना बुकिंगच्या वेळी द्यावी लागेल.
24 x 7 पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी रेल्वेतील प्रत्येक गाडीमध्ये वैयक्तिक बटलर नियुक्त करण्यात आला आहे. प्रवाशांचे मौल्यवान सामान सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर्सही देण्यात आले आहेत. महाराजा एक्स्प्रेस रेल्वेमध्ये लाँड्री सेवा निवडक स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनबोर्ड असताना कॅरेज बटलरशी थेट संपर्क साधून प्रवासी सहजपणे या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
महाराजा एक्सप्रेसचे भाडे किती?
महाराजा एक्सप्रेस रेल्वे ही चार वेगवेगळ्या मार्गांवर चालवण्यात येते. त्यामुळे तिचे 2023-24 आणि 2024-25 या वर्षातील पॅकेज नेमके किती? हे जाणून घेण्यासाठी आम्ही www.the-maharajas.com या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. हे पॅकेज समजून घेण्यासाठी खालील तक्ता पाहा.
बुकिंग कुठे करायची?
महाराजा एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जाण्याची आवश्यकता नाही. महाराजा एक्सप्रेसच्या अधिकृत वेबसाईटला www.the-maharajas.com भेट देऊन तुम्ही घर बसल्या तिकीट बुक करू शकता. ट्रेनचे 4 मार्ग आणि उपलब्ध सुविधांची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे.