रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान करण्यात आलेल्या काळा समुद्र धान्य निर्यात कराराची (Black sea grain deal) मूदत संपली आहे. याचा परिणाम सूर्यफूल तेलाच्या किमतीवर (Sunflower Oil) आणि भारताच्या आयातीवर दिसून येत आहे. भारतातील सूर्यफूल तेलाची आयात सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 30% कमी होऊ शकते. अशी माहिती जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चौधरी यांनी दिली आहे. बिझनेस स्टॅडर्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. परिणामी आगामी काळात खाद्य तेलाच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
पुरवठादारांकडून किमतीत वाढ-
भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारत सुमारे 60% खाद्य तेलाची आयात करतो. भारत साधारणपणे रशिया, युक्रेन, अर्जेंटिना आणि तुर्कस्तानमधून दरमहा सुमारे 250,000 मेट्रिक टन सूर्यफूल तेल आयात करतो. सध्या जागतिक सूर्यफूल तेल उत्पादनात 60% आणि निर्यातीत 76% वाटा काळा समुद्र प्रदेशाचा आहे. मात्र काळा समुद्र धान्य कराराची मुदत संपल्यामुळे तेथील मुख्य बाजारपेठेत तेलांच्या किमतीमध्ये गेल्या पाच आठवड्यांत प्रति मेट्रिक टन 850 ते 965 डॉलरने वाढ झाली आहे.
आयातीमध्ये 75 हजार टनाची घट
भारत जुलैमध्ये सुमारे 275,000 टन सूर्यफूल तेल आयात करू शकेल. परंतु ऑगस्टपासून आयात सुमारे 200,000 टनांपर्यंत घसरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारताला निर्यात होणाऱ्या एकूण सुर्यफूल तेला पैकी 50 % पुरवठा हा युक्रेनकडून केला जातो. मात्र युक्रेनच्या बंदरांवर मोठ्या जहाजांचे लोडिंग काळा समुद्र धान्य कराराशिवाय शक्य नाही. त्याचा परिणाम निर्यातीवर होऊ शकतो.
काय आहे काळा समुद्र धान्य निर्यात करार ?
युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश धान्यांची सर्वाधिक निर्यात करणारे देश आहेत. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यामुळे येथून होणाऱ्या धान्य निर्यातीवर युद्धाचा काहीही परिणाम होऊ नये. तसेच जगातील गरीब देशांना केला जाणारा धान्याचा पुरवठा कायम राहावा यासाठी रशिया आणि युक्रेन या दोन देशामध्ये काळा समुद्र धान्य निर्यात करार (Black sea grain deal) करण्यात आला होता. आता या कराराची मूदत समाप्त झाली आहे.