रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारतीय ऑईल कंपन्या मोठ्या प्रमाणात रशियाकडून स्वस्त दराने कच्च्या तेलाची खरेदी करून नफा कमवत होत्या. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात भारताने तेलाच्या आयातीमध्ये घट केली आहे. रशियाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाची आयातीमध्ये (Russian oil imports) 7 टक्क्यांनी घट झाली असून आता रोज 43.5 लाख बॅरल तेलाची आवक होत आहे. याच बरोबर आखाती देशाकडूनही करण्यात येणाऱ्या तेलाच्या खरेदीमध्ये घट झाली आहे.
यामुळे आयातीवर परिणाम
भारतीय ऑईल कंपन्या रशियांकडून स्वस्त दराने तेल खरेदी करून युरोपी राष्ट्रांना जास्त दराने तेल विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. मात्र, रशियन निर्यातदारांकडून तेलाच्या किमतीवर देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये घट झाली आहे. तसेच भारतीय ऑईल रिफायनरींच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणांमुळे रशियाकडून तेल खरेदीला थोडा लगाम लावण्यात आला आहे. तसेच भारतात देखील मान्सूनमुळे तेलाच्या मागणीत घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने रशियाकडून दररोज 14.6 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. तर जुलै महिन्यात दररोज 19.1 लाख बॅरल तेल खरेदी करण्यात आली होती.
दिवसाला 301,000 बॅरल युनिटची क्षमता मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि., या कंपनीने दोन तृतीयांश आयात कमी केली आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजने देखील सरासरी 1.2 ते 1.3 दशलक्ष बॅरल्सची खरेदी आता 1.1 दशलक्ष बॅरल्सवर आणली आहे.
भारतीय ऑईल कंपन्यांनी कमावला नफा
रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपीय देशांनी रशियाकडून तेल खरेदीवर प्रतिबंध लागू केले होते. त्यामुळे रशियाने स्वस्त दराने कच्च्या तेलाची विक्री सुरु केली. याचा फायदा घेत भारतीय ऑईल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात घेत कच्च्या तेलाची खरेदी केली. तेल शुद्ध करून युरोपीय राष्ट्रांना विक्रीकरत मोठ्या प्रमाणात नफा कमवला आहे. भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी युरोपची मोठी बाजारपेठ काबीज करत तेलाची विक्री केली आहे. भारताने दररोज 2,00,000 बॅरल तेलाची निर्यात युरोपीय देशांना केली आहे.