भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस नवी उंची गाठते आहे यात शंका नाही. आजघडीला भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. जगभरातील नावाजलेल्या कंपन्या देशात गुंतवणूक करण्यास तयार आहेत, सरकारी धोरणे देखील त्याच अनुषंगाने आखली जात आहेत. येत्या काळात ही घोडदौड अशीच कायम ठेवण्याचा सरकारचा देखील विचार आहे. परंतु अशातच भारतातील आर्थिक असमानता देखील वाढतानाचे चित्र समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या एका अहवालात हे निरीक्षण नोंदवले आहे. खरे तर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत जगातील गरीब देशांच्या श्रेणीत येतो असे या अहवालात म्हटले आहे. एकूण 197 देशांची यादी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केली असून त्यात भारताचा 142 वा क्रमांक लागतो.
इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती
अहवालात अमेरिकेचे वार्षिक दरडोई उत्पन्न 80,035 डॉलर इतके आहे असे म्हटले आहे. तर भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न केवळ 2601 डॉलर (2,13,462 रुपये) इतके नोंदवले गेले आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारताच्या दरडोई उत्पन्नाचा विचार करता, आपल्यापेक्षा 31 पटीने अधिक अमेरिकन लोकांचे दरडोई उत्पन्न आहे. चीन या देशाचा विचार करता भारतापेक्षा 5 पट चीनचे दरडोई उत्पन्न आहे.
काय आहेत कारणे?
भारताचे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे भारताची वाढती लोकसंख्या. देशात जितकी लोकसंख्या अधिक असेल तितके संपत्तीचे वाटप अधिक होत असते. लोकसंख्येच्या बाबतीत नुकतेच भारताने चीनला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवलाय. लोकसंख्येच्या तुलनेत रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी वाढत नसल्यामुळे नागरिकांचे दरडोई उत्पन्न दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. याशिवाय इतर कारणे खालीलप्रमाणे:
भारतातील दरडोई उत्पन्नावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, त्यापैकी काहींचा समावेश आहे:
आर्थिक सुधारणा: आर्थिक सुधारणा हा दरडोई उत्पन्नावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था सुधारते तेव्हा त्यातून अधिक उत्पन्न आणि नोकरीच्या संधी निर्माण होत असतात, ज्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे सरकारने आर्थिक सुधारणा करण्यावर आणि रोजगार निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे.
शिक्षण आणि कौशल्य-प्रशिक्षण: भारताने कौशल्य विकास कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. कुशल कामगार गुणवत्तापूर्ण काम करू शकतात हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विशेष कौशल्यपूर्ण व्यक्ती रोजगारासाठी परिपूर्ण असतात, त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. भारतातील दरडोई उत्पन्न वाढीमागे कुशल कामगारांचा आभाव हे देखील कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे.
पायाभूत सुविधा: रस्ते, वाहतूक आणि दळणवळण प्रणाली यासारख्या पायाभूत सुविधांची उपलब्धता देशाच्या आर्थिक सुधारणेसाठी महत्वाच्या असतात. ज्या देशात अधिक पायाभूत सुविधा असतात त्या देशात उद्योगधंदे अधिक वाढीस लागतात आणि सामन्यांचे जनजीवन सुधारते.याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढण्यास फायदाच होतो.
8 वर्षात दरडोई उत्पन्न दुप्पट
2014-15 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 86,647 रुपये इतके होते..एनएसओच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचे दरडोई उत्पन्न आता 1,72,000 रुपये इतके झाले आहे. म्हणजेच गेल्या 8 वर्षात भारताच्या दरडोई उत्पन्नात दुप्पट वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले होते. परंतु जागतिक पातळीवर मात्र भारताचा विकास संथगतीने सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.