यंदाचा मान्सून सर्वांसाठी लाभदायी ठरणार आहे असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात देशांतर्गत उत्पन्नात झालेली वाढ, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचा होत असलेला विस्तार या सगळ्या घटना देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
जागतिक आर्थिक मंदीचे संकट
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत काही उतार चढाव दिसू शकतात. या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था कशी उत्तम कामगिरी करेल हे बघणे गरजेचे आहे आणि त्यावर सरकार विशेष लक्ष देणार असल्याचे म्हटले आहे.
अलीकडच्या वर्षात सरकारने भांडवली खर्चावर अधिक भर दिला असल्याने आणि पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात केल्यामुळे खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच यानिमित्ताने खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, उत्पन्न आणि उत्पादकता देखील वाढली असल्याचे म्हटले आहे.
निर्यातीवर अधिक भर
भारत सरकारने देशांतर्गत उत्पन्नावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे देशातील गरजा देशांतर्गत उत्पन्नातूनच भागवल्या जातील आणि ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे परदेशी वस्तूंची आयात कमी होईल सोबतच भारतीय मालाची निर्यात देखील वाढेल असा विश्वास वित्त मंत्रालयाने व्यक्त केला आहे. जागतिक घडामोडी देखील सध्या भारतासाठी अनुकूल असून भारताची निर्यात यंदाच्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात वाढेल असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
धोरणात्मक दक्षता
सध्याची जागतिक आणि देशाची आर्थिक परिस्थिती आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल असली तरी याबाबत धोरणात्मक दक्षता घेणे जरुरी असल्याचे देखील वित्त मंत्रालयाच्या मासिक आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. चलनवाढीचा दबाव आता कमी झाला असून खाजगी क्षेत्रात पुन्हा एकदा नवऊर्जा संचारली आहे, ही परिस्थिती कायम राखण्यासाठी सर्वानांची धोरणात्मक विचार करायला हवा असे देखील या सर्वेक्षणात सुचवले गेले आहे.