जगभरात आर्थिक मंदीचं सावट असताना भारताच्या अर्थकारणावर त्याचा फारसा परिणाम जाणवलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप उद्योगधंद्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे आणि भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस बळकट होताना दिसते आहे. एकीकडे अमेरिका, जर्मनी तसेच काही युरोपियन देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना भारताच्या आर्थिक विकासाबाबत जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody’s) पुन्हा एकदा भारतावर विश्वास व्यक्त केला आहे.
अर्थव्यवस्था जोमात, नोकरशाहीचा अडसर
मूडीजने त्यांच्या अहवालात एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. अहवालानुसार येत्या काळात भारताची आर्थिक घोडदौड अशीच कायम राहणार असून भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर देखील चांगली कामगिरी करेल असे म्हटले आहे. असे असले तरी नोकरशहा म्हणजेच शासकीय अधिकारी हे भारताच्या आर्थिक विकासात अडथळा ठरू शकतात असे देखील या अहवालात म्हटले आहे. भारतात आता देखील उद्योगधंद्यांना सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असे म्हटले आहे.
India Inc. will rapidly grow over the next few years, amid strong domestic demand and expanding capacity across key sectors. But reform implementation and policy barriers could slow investment.
— Moody's Investors Service (@MoodysInvSvc) May 25, 2023
Register for our India & ASEAN session in the EM Summit: https://t.co/tw8GAoDCmc pic.twitter.com/8iaL38g5oX
एकीकडे जगभरातील बड्या अर्थव्यवस्था आर्थिक संकटात असताना भारताची सुदृढ अर्थव्यवस्था भारतीयांसाठी मोठ्या संधी घेऊन येणार आहे. तर दुसरीकडे मात्र नोकरशाहीचा अडसर अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. मूडीजच्या अहवालानुसार, 2022 मध्ये भारताची आर्थिक उलाढाल 3.5 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होती आणि पुढील 5 वर्षात G20 देशांच्या यादीत भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान पद्धतीने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार आहे असे देखील म्हटले गेले आहे.
युवाशक्तीमध्ये ताकद
मूडीजने त्यांच्या अहवालात असे देखील नमूद केले आहे की, भारताला महासत्ता बनविण्याची ताकद भारतातील युवकांमध्ये आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारत देश ओळखला जातो. नवनिर्माण करण्याची पूर्ण क्षमता भारतीय युवा वर्गात आहे. या पार्श्वभूमीवर मूडीजने हे निरीक्षण नोंदवले असल्याचे जाणकार सांगतात.
भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. विकसित देश होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये आजच्या भारताच्या युवाशक्तीकडे आहेत. भारतात सुशिक्षित तरुणांची संख्या मोठी आहे आणि त्यांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या कौशल्य विकास योजना राबविल्या जात आहेत. युवाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे भारत देश आज प्रत्येक क्षेत्र प्रगती करत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेची दिशा युवावर्गच ठरवतील असे देखील अहवालात म्हटले आहे.