रशिया युक्रेन युद्धानंतर जगभरामध्ये तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. जागतिक इंधन पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे दरवाढ होत आहे. भारतामध्ये मागील काही महिन्यांपासून इंधनाची गरज वाढत आहे. डिसेंबर महिन्यात देशामध्ये इंधनाची गरज 3.1% वाढली आहे. मागील वर्षी याच काळात इंधनाची गरज कमी होती.
पेट्रोल आणि घरगूती गॅसचा वापर वाढला
देशातील इंधनाची गरज डिसेंबर महिन्यात 3.1% टक्के वाढून 19.60 मिलियन टन झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनॅलिसीस सेल (PPAC) ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात पेट्रोलची मागणी 5.9% वाढून 2.98 मिलियन टन झाली. तर एलपीजी गॅसची गरज 3.9% वाढून 2.58 मिलियन टन झाली.
भारताने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रशियामधून 1.7 मिलियन बॅरल प्रति दिन कच्चे तेल आयात केले. युरोप आणि अमेरिकेने रशियन तेलावर निर्बंध घातले असले तरी भारताने रशियाकडून आयात सुरूच ठेवली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांनी रशियन इंधनावर प्राइज कॅप लावली आहे. म्हणजेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर युरोपियन कंपन्या रशियाला देणार नाहीत.
जगभरातील काही भागात उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ऊर्जेची मागणी वाढली. दुष्काळामुळे धरणांमधील पाणीसाठी कमी झाल्याने जलविद्युत ऊर्जा प्रकल्पही बंद झाले. अणू ऊर्जा प्रकल्पांमधून होणारी ऊर्जा निर्मितीही पुरेशी नाही. विषेशत: युरोपमध्ये अणू ऊर्जा निर्मिती कमी होत आहे. फ्रान्स देशाने तर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे आण्विक ऊर्जा प्रकल्प बंद ठेवले आहेत.
येत्या काळात भारतामध्ये कोळशाची मागणी 7 टक्क्यांनी वाढेल. युरोपियन देशांमध्ये 6 टक्के तर चीनमध्ये 0.4 टक्के कोळशाची मागणी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रशियामधून युरोपला वायू पुरवठा कमी झाल्याने युरोपियन देशही कोळशाकडे वळले आहेत.