कार खरेदीला भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. मागील वर्षी भारतात कार विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. वाहन कर्ज घेऊनही कार खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती आहे. भारतीयांच्या कार खरेदी करण्याच्या बजेटमध्ये 30 टक्के वाढ झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 2022 वर्षात भारतीय ग्राहकांनी कार खरेदीसाठी ३० टक्के अधिक रक्कम खर्च केली, असे कार्स 24 ने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
मागील वर्षात सरासरी भारतीय ग्राहकांच्या कार खरेदी बजेटमध्ये साडेचार लाखांवरून साडेसहा लाखांपर्यंत वाढ झाली आहे. 'द मायलेज रिपोर्ट' कार्स 24 ने प्रकाशित केला असून त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे. 2022 वाहन क्षेत्रासाठी चांगले होते. भारतीय ग्राहकांची कार खरेदी वाढत असून येत्या काळात अधिक वाढ होईल, असे कार्स 24 चे सहसंस्थापक गजेंद्र जांगिड यांनी म्हटले.
कार घेताना मायलेजला प्राधान्य
गाडीचे मायलेज हा कार घेताना महत्त्वाचा मुद्दा भारतीय ग्राहक विचारात घेतात, असे अहवालात म्हटले आहे. विविध इंधन प्रकारांमध्ये कारचे मायलेज किती आहे? याबाबत ग्राहकांनी जास्त विचारणा केली. मागील वर्षी प्रत्येक दोन मिनिटांनी ग्राहकांनी मायलेजबाबत प्रश्न विचारल्याचे अहवालात म्हटले आहे.
हैदराबाद, लखनऊ, कोलकाता शहरामध्ये सर्वात जास्त कार कर्ज काढून घेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. वर्षभरात एकापेक्षा जास्त कार घेणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण 81% झाल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२२ वर्षात सर्वात जास्त कार मारुती सुझुकी कंपनीच्या विक्री झाल्या. प्रत्येक ३ कारमागे १ कार मारुती सुझुकी कंपनीची होती, असे अहवालात म्हटले आहे.