India Trade Deficit: मागील सुमारे दोन वर्षांपासून भारताची व्यापारी तूट वाढतच चालली होती. म्हणजे निर्यातीपेक्षा जास्त वस्तू भारत परदेशातून आयात करत होता. मात्र, यात आता बदल होत आहेत. एप्रिल महिन्याची आकडेवारी पाहता व्यापारी तूट कमी झाली आहे. जागतिक स्तरावर वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाल्याचा परिणाम व्यापारावरही झाला आहे.
देशांतर्गत वस्तुंची मागणी घटल्याने आयात रोडावली
चालू वर्षी एप्रिल महिन्यात भारताने सुमारे 34 हजार कोटी डॉलरच्या वस्तू विविध देशांमध्ये निर्यात केल्या. मार्चमध्ये हा आकडा 38 हजार कोटी इतका होता. तर एप्रिल महिन्यात भारताने विविध देशांतून 49 हजार कोटी डॉलर किंमतीच्या वस्तू आयात केल्या. मागील वर्षी एप्रिल महिन्यात ही आकडेवारी 58 हजार कोटी इतकी होती. मात्र, आता देशांतर्गत मागणी कमी झाल्याने आयातही घटली आहे.
एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये आयात 14.1% कमी झाली तर निर्यातही 12.7 टक्क्यांनी रोडावली आहे. यातून एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी दिसून येत आहे.
कोणत्या वस्तुंची मागणी कमी झाली
रशिया युक्रेन युद्धानंतर वस्तू आणि सेवांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. हे दर आता खाली येत आहेत. कच्चे तेल, पेट्रोलियम पदार्थ, कोळसा या पदार्थांची आयात घटली. तसेच ज्वेलरी, हिरे, मोती यांची आयात रोडावली आहे. लोकांच्या हातातील पैसा कमी झाल्याने ऐच्छिक वस्तुंच्या खरेदीकडे भारतीयांनी पाठ फिरवली आहे. या वस्तुंची मागणी कमी झाल्याने आयातही रोडावली त्याचा वित्तीय तूट कमी होण्यात फायदा झाला.
सेवा क्षेत्राची निर्यातीचा वाढता आलेख
मागील वर्षभरापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे उत्पन्न आणि व्यवसायही रोडावला होता. मात्र, कंपन्यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर आणि विविध टेक सेवा यांच्या निर्यातीचे प्रमाण आता वाढत आहे. चौथ्या तिमाहीत आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी काही एकंदर प्रगती दर्शवली. येत्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र पुन्हा उभारी घेईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.