Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railway's new initiative : भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम, चालत्या ट्रेनमध्ये कॅमेरे ठेवणार लक्ष!

Indian Railway's new initiative : भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम, चालत्या ट्रेनमध्ये कॅमेरे ठेवणार लक्ष!

Indian Railway's new initiative : भारतीय रेल्वेतर्फे आता चालत्या ट्रेनमध्ये कॅमेऱ्याची प्रणाली सुरू केली जाणार आहे. हिंसक कृती तसंच गैरमार्गाच्या प्रकारांना रोखण्यासाठी विविध उपक्रम रेल्वेतर्फे राबवण्यात येतात. त्यातलाच हा एक उपक्रम असून तो लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तिकीट तपासतेवेळी पारदर्शकता (Transparency during ticket checking), सुरक्षितता अशा काही महत्त्वाच्या उद्देशानं हे कॅमेरे (Camera) बसवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला. प्रवाशांचं तिकीट तपासताना अधिक पारदर्शकता राखण्याच्या साठी नवीन प्रणालीचा आधार घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या (CR) मुंबई विभागात ही नवी प्रणाली सुरूदेखील करण्यात आलीय. प्रवाशांचं तिकीट तपासण्यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत, त्यातलीच ही एक पायरी आहे. पारदर्शकता आणण्याबरोबरच कर्मचाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी (Complaints) कमी करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं रेल्वेच्या मुंबई विभागानं सांगितलंय.

आणखी कोणते उपाय?

बॉडी कॅमेरे

तिकीट तपासताना सुरक्षितता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या मुंबई विभागातल्या तिकीट तपासनीसांना बॉडी कॅमेरे देण्यात येत आहेत. तिकीट तपासणीच्या दरम्यान या कॅमेऱ्यांमुळे अधिक पारदर्शकता येईल. तिकिट तपासणीच्या दरम्यान जेव्हा तक्रारी येतात, त्यावेळी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. कॅमेरा आणि फुटेज असेल तर तक्रारींचा निपटारा त्वरीत होण्यास मदत होते. यामुळे जबाबदारी वाढेल आणि कर्मचार्‍यांना प्रतिष्ठेच्या नुकसानीपासून संरक्षणदेखील मिळणार आहे. प्रायोगित तत्वावर रेल्वेच्या मुंबई विभागानं जवळपास 50 कॅमेरे खरेदी केले आहेत. प्रत्येक कॅमेऱ्याची किंमत 9,000 रुपये आहे. या कॅमेऱ्यांमध्ये सुमारे 20 तासांचं फुटेज रेकॉर्ड होऊ शकतं.

कोड स्कॅनिंग अ‍ॅपची सुविधा

तपासणीस तिकीट तपासत असताना दंडाच्या रकमेबद्दल अनेकवेळा वाद होतात. शिवाय भरण्याचं माध्यमदेखील अडचणीचं असतं. अशावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एसबीआय योनो (SBI YONO) या मोबाइल अ‍ॅपद्वारे पेमेंटची सुविधा सुरू केलीय या अ‍ॅपद्वारे यूपीआय/क्यूआर (UPI/QR) कोड स्कॅन करून दंडाची रक्कम भरता येईल. या नव्या प्रणालीच्या माध्यमातून प्रवासी तिकीट परीक्षकांना (TTE) दंड किंवा जास्त भाडे भरण्यास मदत करणार आहे. ऑनलाइन पेमेंट होत असल्यानं अधिक पारदर्शकता येणार आहे. रोख हाताळणी यामुळे कमी होईल. तर व्यवहार अधिक सुरक्षित होईल. शिवाय डिजिटल इंडिया या मिशनच्या प्रचारासाठीही लाभदायी असेल.

कागदी चार्टवरचा खर्च वाचवला

या उपक्रमाची सुरुवातही झालीय. पश्चिम रेल्वेच्या झोननं 298 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालवणाऱ्या सर्व 1383 तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना हँड हेल्ड टर्मिनल (HHTs) डिव्हाइस प्रदान केलं आहे. या उपक्रमानंतर कागदी चार्ट पूर्णपणे रद्द करण्यात आलेत. पेपरलेस काम यामुळे शक्य होणार आहे. म्हणजेच रेल्वेचा पेपरवर खर्च होणारा अनावश्यक पैसा वाचणार आहे. पेपरलेस आणि डिजीटल असे दोन्ही उद्देश साध्य होतील. या नव्या प्रणालीचा जवळपास 40,000पेक्षा जास्त प्रवाशांना फायदा झालाय.

काही सवलती बंद

रेल्वेनं हा नवा उपक्रम सुरू केला असला तरी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं अलिकडेच ज्येष्ठ नागरिकांची सवलतीची योजना बंद केली. कोरोनापूर्वी 60 वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात 50 टक्के सूट दिली जात होती. ही योजना आता बंद करण्यात आलीय. यामुळे रेल्वेला 2242 कोटींचा अतिरिक्त नफा झालाय. आता पुन्हा ही योजना सुरू होणार का तसंच इतर कोणते उपक्रम आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे घेऊन येणार हे येत्या काळात दिसून येईल.