भारताने आपला पायाभूत विकास पूर्ण केला असून येणाऱ्या काळात डिजिटल प्रणाली विकसित करण्यावर आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे. देशातील पायाभूत सुविधा आता सर्वांसाठी उपलब्ध असून लोकांचे राहणीमान अधिक चांगले कसे करता येईल यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचेही त्या म्हणाल्या.
अर्थमंत्री निर्मला सितारामन या सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (Peterson Institute for International Economics) या संस्थेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी ही माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करायची असेल तर देशात डिजिटल प्रणाली अधिकाधिक विकसित करणे, सर्वसामान्य लोकांना डिजिटल पेमेंट्स, सुविधांचे ज्ञान देणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की भारत सरकार गरीब लोकांना मूलभूत सुविधा देऊन त्यांना सक्षम बनवू इच्छित आहे. मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही आमचे लक्ष्य जवळपास पूर्ण केले आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही वर्षात भारतात झपाट्याने काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. भारत सरकार अनेक लोककल्याणकारी योजना राबवत आहे. नागरीकांना राहण्यासाठी पक्की घरे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वीज आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरे गावांना जोडली जावीत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
FM #NirmalaSitharaman said that due to its achievements in transitioning to #digitalpayments and integrating the informal sector, India meets the requirements of a fair and transparent economy https://t.co/aqhJ27RjrI
— Financial Express (@FinancialXpress) April 11, 2023
'डिजिटल इंडिया' एक सकारात्मक योजना
डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सामान्य नागरिकांना मोबाईलवरून पेमेंट करण्याची, आर्थिक व्यवहार उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना यशस्वी ठरते आहे असेही अर्थमंत्री म्हणाल्या. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते खोलले जावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्या म्हणाल्या. सरकारी योजनांचा निधी, अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पोहोचत असल्याने, शासकीय योजनांची पारदर्शकता वाढली आहे असे निरीक्षक देखील त्यांनी नोंदवले. आरोग्य, शिक्षण आणि बँकिंग क्षेत्राचे मोठया प्रमाणावर डिजिटायजेशन झाल्याचे त्या म्हणाल्या. इतर क्षेत्रातही डिजिटल प्रणालीचा अवलंब करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या.
कौशल विकास योजनेवर भर
लोकांचा कौशल्य विकास होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती देखील अर्थमंत्र्यांनी दिली. देशभरात आज अनेक ठिकाणी कौशल्य केंद्रे उभी राहिली आहेत. व्यावसायिक कौशल्याची पातळी व्यक्तीपरत्वे बदलत असते याची जाणीव ठेवून आवश्यकतेनुसार कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहेत. येणाऱ्या काळात कौशल्यप्राप्त युवा वर्ग मोक्याच्या जागी स्वतःची सिद्धता दाखवून देतील आणि अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. भारताचा विकास प्रवास योग्य मार्गावर सुरु असून शाश्वत विकासाद्वारे नागरिकांचे जीवन सुलभ होत असल्याचा विश्वास देखील अर्थंमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
भारताच्या विकास दर सातत्याने वाढत असून देशातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीमुळे देशाचा विकास दिवसेंदिवस नवी पातळी गाठत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.