चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.5 टक्के ते 7.5 टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याची अपेक्षा असल्याचे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. भारतातील वाढते उद्योगधंदे, गुंतवणूक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता हा अंदाज लावता येऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. येणारा काळ भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असेल असे देखील त्यांनी म्हटले आहे. कोविडनंतर मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली असून भारताने आता जोर पकडला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारचे धोरण सकारात्मक
अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्यासाठी आणि त्याचा निरंतर विकास आणि वृद्धी सुनिश्चित करण्यासाठी सरकारने महसुली खर्चापेक्षा जमिनीतील गुंतवणूक वाढवली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे असे व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
लखनौमध्ये बांधकाम क्षेत्रातील उद्योगपतींसोबत 'बिल्डिंग अ स्ट्राँगर इकॉनॉमी' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात होत असलेले बदल देखील नमूद केले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून कॉर्पोरेट क्षेत्राने त्यांचा आर्थिक ताळेबंद सुधारला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार कॉर्पोरेट क्षेत्राने कर्ज कमी आणि नफा वाढवला आहे. भारताच्या आर्थिक वाढीसाठी हे उत्साहवर्धक चित्र असल्याचे देखील ते म्हणाले.
The Indian economy is expected to grow in a range of 6.5-7.5% in the current fiscal buttressed by a strong growth momentum seen in investments and efficiency gains from rapid pace of #digitaltransformation. - Dr V Anantha Nageswaran, Chief Economic Advisor, Govt of India… pic.twitter.com/wQclFVUF9T
— Confederation of Indian Industry (@FollowCII) June 9, 2023
भारताचे सुदृढ आर्थिक धोरण
कोविड संक्रमणाच्या काळात केवळ देशातीलच नाही तर जगभरातील अर्थव्यवस्था संकटात होत्या. अशाही काळात भारताने आखलेले आर्थिक धोरण महत्वाचे आणि परिणामकारक ठरले आहे. भारताचे सुदृढ आर्थिक धोरण, तसेच गेल्या आठ वर्षांत देशभरात उभारलेल्या पायाभूत सुविधा आणि डिजिटल परिवर्तनामुळे दीर्घकालीन विकास साधणे शक्य झाले आहे असे व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था सध्या ऑटोपायलट मोडवर आहे. कोविड संक्रमणानंतर ती प्रभावीपणे परत रुळावर आली आहे. तसेच 2022-23 मध्ये सुधारित जीडीपी वाढीचा दर 7.2 टक्के असेल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा विचार करता ही आर्थिक वाढ 8 टक्क्यांपर्यंत देखील जावू शकते असेही ते म्हणाले आहेत.
खाजगी क्षेत्र मजबूत
भांडवली गुंतवणुकीबाबत बोलताना व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सांगितले की खाजगी क्षेत्र मजबूत गुंतवणूक वाढ साध्य करण्यासाठी तयार आहे.खाजगी क्षेत्रातील कंपन्या सध्या उत्तम कामगिरी करत असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे असे देखील ते म्हणाले.