Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Drug Export: औषधे निर्यात करण्यापूर्वी गुणवत्ता चाचणीला सामोरे जाणार? कफ सिरपवर सरकारची नजर

Drug Export

Image Source : www.cdsco.gov.in

भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असे म्हटले जाते. मात्र, आता फार्मा कंपन्यांवरील सरकारी निर्बंध कठोर होत आहेत. भारतीय कफ रिसपमुळे परदेशात लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर औषधांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे कफ सिरपची सरकारी प्रयोगशाळेत चाचणी करूनच निर्यात करण्याचे नियोजन सरकार आखत आहे.

Drug Export: भारत हा जगातील आघाडीचा औषधे निर्यात करणारा देश आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून भारतीय फार्मा कंपन्या वादात सापडल्या आहेत. विशेषत: लहान मुलांसाठी कफ सिरप निर्यात करणाऱ्या कंपन्या सरकारच्या रडावर आहेत.

उझबेकिस्तान आणि गांबिया देशात 300 पेक्षा जास्त लहान मुलांचा मृत्यू भारतीय कफ सिरपच्या सेवनामुळे झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही याची चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळून आल्याने भारताची फार्मा कंपन्यांची जागतिक स्तरावर प्रतिमा मलिन झाली. उत्तरप्रदेशातील काही कंपन्यांचे परवानेही रद्द करण्यात आले होते. 

त्यामुळे भारतामधून जे कफ सिरप परदेशात निर्यात होईल त्याची चाचणी भारतीय प्रयोगशाळेत घेऊनच निर्यात करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसून आरोग्य मंत्रालय लवकरच यावर निर्णय घेणार आहे. Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) ने हा प्रस्ताव तयार केला आहे. भेसळयुक्त औषधांची निर्यात टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

औषध तपासणीसाठी प्रयोगशाळा देशात कुठे आहेत?

भारतामध्ये पाच औषध तपासणी प्रयोगशाळा CDSCO अंतर्गत आहेत. हिमाचल प्रदेशातील कसौली, कोलकाता, हैदराबाद, चैन्नई आणि मुंबई येथे आहेत. तर दोन विभागीय प्रयोगशाळा गुवाहटी आणि चंदीगढ येथे आहेत.

भारताची औषध निर्यात आकडेवारी काय सांगते?

भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात. औषधांच्या जागतिक निर्यातीच्या 20% वाटा भारताचा आहे. तर 60% निर्यात होणाऱ्या व्हॅक्सिन या भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या असतात. यात सिरम ही पुण्यातील कंपनी आघाडीवर आहे. 2021-22 मध्ये भारताने 2 हजार 400 कोटी डॉलर किंमतीची औषधे जगभरातील 100 पेक्षा जास्त देशांना निर्यात केली. कोरोनाकाळात तर ही निर्यात आणखी वाढली होती.

भारतीय फार्मा कंपन्यांवर काय परिणाम होऊ शकतो?

औषध निर्मिती करताना सर्व नियमांचे पालन केले आहे का? भेसळ होईल अशा पद्धतीने निर्मिती होत आहे का? याची तपासणी CDSCO कडून होत असते. मात्र, तरीही भेसळयुक्त औषधे निर्मिती होत असेल तर त्याचा परिणाम भारतीय निर्यातीवर होऊ शकते.

उझबेकिस्तान आणि गांबिया देशातील लहान मुलांच्या मृत्यू प्रकारानंतर इतर देशही सावध झाले आहेत. कोणतेही भारतीय औषध आयात करण्यापूर्वी सखोल तपासणी केली जात आहे. तसेच त्या देशातील औषध नियंत्रण यंत्रणांकडून भारतीय कंपन्यांना भविष्यात अटी घातल्या जाऊ शकतात. येत्या काळात निर्यातही रोडावू शकते. त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस सह इतरही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनांना भारतीय कंपन्या औषधे पुरवतात. ही औषधे गरीब देशांना वाटण्यात येतात. यासाठी WHO, रेडक्रॉस बोली लावत असते. मात्र, त्यासाठी फार्मा कंपन्यांना अटींची पूर्तात करावी लागते. मात्र, आता भारतीय कंपन्यांना अशी कंत्राटे मिळण्यात अडचणी येऊ शकतात.