रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्याने वाहनकर्ज आणि गृहकर्ज महागले आहे. मात्र, तरीही भारतीयांना महागाईची अजिबात चिंता नाही, असे डेलॉइट कंपनीने केलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. महागाई वाढत असली तरीही भारतीय कारचा इएमआय भरण्यास तयार आहे, असे समोर आले आहेत. अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी बहुतांश नागरिक 10 लाख ते 25 लाखांच्या दरम्यान किंमत असलेली कार घेण्यासाठी इच्छुक आहेत.
कारच्या फिचर्सला अधिक पसंती
डेलॉइट ग्लोबल ऑटोमोटिव्ह कन्झ्युमर स्टडी 2023 असे या अभ्यासाचे नाव आहे. भारतीयांचे कारप्रेम दिवसेंदिवस वाढत चालल्याचे अहवालातून समोर आले आहे. अधिक चांगले फिचर्स असलेली सर्वोत्तम कार घेण्याकडे भारतीयांचा कल आहे. फक्त किंमतीकडे पाहून भारतीय कारची निवड करत नाहीत. हा ग्राहकांचा कार खरेदीमधला पॅटर्न बदलत आहे. आपली आवडती गाडी घेण्यासाठी तीन महिन्यांपर्यंत प्रतिक्षा करण्यासाठी ग्राहक तयार आहेत. यातून असे दिसते की, फक्त किंमत नागरिकांसाठी महत्त्वाची नाही तर कोणत्या ब्रँडची, काय फिचर्स असलेली कार खरेदी करत आहोत, याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
10 लाखांपेक्षा जास्त किंमतीची कार घेण्यास इच्छुक
या अभ्यासासाठी 1 हजार नागरिकांना कार खरेदीबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले. यातील 47 टक्के नागरिकांनी 10 लाख ते 25 लाखांच्या दरम्यान किंमत असलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. 10 लाखांपेक्षा कमी किंमतीची कार खरेदी करण्याची इच्छा 28 टक्के नागरिकांनी दर्शवली.
मायलेज पेक्षा क्लालिटी आणि ब्रँडला महत्त्व
पारंपारिक भारतीय ग्राहक गाडीची किंमत आणि मायलेज या दोन गोष्टींचा सर्वात जास्त विचार करत होता. मात्र, आता किंमतीपेक्षा गाडी वापराच्या अनुभवास जास्त पसंती देत आहेत. एका कारच्या ब्रँडला साडून दुसऱ्या ब्रँडची कार घेताना ग्राहक सर्वात जास्त विचार गाडीची क्वालिटी, फिचर्स आणि ब्रँड इमेजला अधिक महत्त्व देत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. एखाद्या गाडीसाठी वेटिंग जास्त असली तरी ग्राहक प्रतिक्षा करण्यास तयार आहेत. मात्र, दुसऱ्या ब्रँडची कार खरेदी करत नाहीत.