शेअर बाजारातल्या सूचिबद्ध (Listed) कंपन्यांची कामगिरी चांगली राहिलीय. त्यामुळे लाभांशही (Dividend) तसाच देण्यात आलाय. आर्थिक वर्ष 2023मध्ये काही कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मागच्या वर्षीपेक्षा 26 टक्के जास्त लाभांश देण्याची घोषणा केलीय. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023मध्ये देशातल्या 317 कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना )Investors) तब्बल 3.26 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. हे प्रमाण आर्थिक वर्ष 2022च्या तुलनेत 26 टक्क्यांहून जास्त आहे. यासोबतच या कंपन्यांच्या पेआउट रेशोमध्येदेखील वाढ झालीय. आर्थिक वर्ष 2022मध्ये 34.66 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2023मध्ये 41.46 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आलीय. टीव्ही 9नं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
टीसीएस अग्रस्थानी
विविध कंपन्यांनी लाभांश दिले. मात्र सर्वात जास्त लाभांश कोणी दिला, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं सर्वात जास्त लाभांश दिलाय. 42,090 कोटी रुपयांचा हा लाभांश असून यादीत शीर्षस्थानी आहे. गेल्या वर्षीपेक्षा कंपनीनं 167.4 टक्के जास्त लाभांश गुंतवणूकदारांना जाहीर केलाय. वेदांतानं 37,758 कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. हादेखील वर्षीच्या तुलनेत 126 टक्क्यांनी जास्त आहे. हिंदुस्थान झिंक 319 टक्के वाढीसह 31,899 कोटी रुपयांचा लाभांश देईल.
लाभांश वाढीची कारणं
स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, कोल इंडिया 20,491 कोटी म्हणजे 95.6 टक्के वाढ, आयटीसी (ITC) 15,846 कोटी म्हणजे 11.8 टक्के वाढ, ओएनजीसी 14,153 कोटी आणि इन्फोसिस 14,069 कोटी या कंपन्या पहिल्या दहामध्ये आहेत. बर्जर पेंट्स इंडियाचे एमडी आणि सीईओ अभिजीत रॉय यांनी एफई रिपोर्टमध्ये याविषयी सांगितलंय. ते म्हणाले, की कॉर्पोरेट्सनी कोविडच्या काळात त्यांचा लाभांश कमी केला होता. ही वाढ महसूल आणि कमाईत झालेल्या वाढीमुळे आहे. हीच वाढ कायम राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
तीन कंपन्यांचा लाभांश दुप्पटीपेक्षा जास्त
गेल्या वर्षीच्या तुलनेत लाभांश दुपटीने वाढल्याचं दिसून आलंय. लाभांश देणाऱ्या यातल्या पहिल्या तीन कंपन्यांनी जाहीर केलेला प्रति शेअर लाभांश मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट होता. टीसीएसनं आर्थिक वर्ष 2023मध्ये प्रति शेअर 115 रुपये लाभांश देण्याचं म्हटलं होतं. आर्थिक वर्ष 2022मध्ये त्यांचा प्रति शेअर 43 रुपये होता. वेदांतानं प्रति शेअर 101.50 रुपये देण्याची घोषणा केलीय. मागील वर्षी तो 45 रुपये होता. हिंदुस्तान झिंकनं प्रति शेअर 75.50 रुपये लाभांश जाहीर केला. मागच्या वर्षी तो 18 रुपये होता. म्हणजेच दुपटीहूनही जास्त लाभांश देण्याची घोषणा करण्यात आलीय.
पुढच्या तीन वर्षांपर्यंत दिसेल वाढ
जेव्हा कॉर्पोरेट्स आर्थिक वर्ष 2024मध्ये आपल्या कॅपेक्समध्ये 14 टक्के वाढ करू शकतील, अशावेळेला या लाभांशातली वाढ दिसून आलीय. पुढच्या तीन वर्षांपर्यंत ही वाढ दिसून येईल. वेदांता बोर्डानं आर्थिक वर्ष 2024साठी प्रति शेअर 18.50 रुपयांचा पहिला अंतरिम लाभांश मंजूर केलाय. याची रक्कम 6,877 कोटी रुपये आहे. वेदांताची मूळ कंपनी वेदांता रिसोर्सेस कर्ज कमी करण्यासाठी निधी गोळा करत आहे, अशावेळीच नेमकं हे पाऊल उचलण्यात आलंय.