Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vostro Account for Trade: आंतरराष्ट्रीय मंचावर रुपयाला डिमांड! 18 देशांसोबतचा व्यापार चालणार रुपयात

Vostro Accounts for Trade

Image Source : www.financialexpress.com

आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 18 देशांसोबत भारताचा व्यापार रुपया चलनामध्ये करता येणार आहे. यासाठी खास परदेशी बँकांशी मिळून Vostro खाती सुरू करण्यात आली आहेत. रशिया, न्यूझीलंड, सिंगापुरसह 18 देशांनी भारतासोबत रुपयामध्ये व्यापार करण्यात रूची दाखवली आहे. त्यामुळे येत्या काळात रुपयाची डिमांड जागतिक स्तरावर वाढेल.

Vostro Accounts for Trade: आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक व्यापार डॉलर चलनामध्ये चालतो. अमेरिकेच्या चलनाची ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी चीनकडूनही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता भारतानेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार करताना रुपयाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. रूपयामध्ये व्यापार करण्याचा निर्णय मागील वर्षी जुलै महिन्यात केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर आता 18 देश भारतीय चलनात व्यापार करण्यास तयार झाले आहेत.

HDFC, UCO सह 30 भारतीय बँकांनी 18 देशातील बँकांशी मिळून Vostro Account सुरू केले आहे. Director General of Foreign Trade (DGFT) संतोष कुमार सारंगी यांनी याबाबत माहिती दिली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देतानाही Vostro Accounts बद्दल माहिती दिली.

परदेशी बँकासोबत मिळून खाते निर्मिती (Vostro Accounts)

भारतीय चलनामध्ये व्यापार करण्यासाठी वोस्ट्रो खाती सुरू करण्यात आली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशी खाती सुरू करण्यास परवानगी दिली आहे. भारतीय बँकांनी 18 देशांतील सुमारे 30 बँकांशी मिळून Vostro Accounts सुरू केले आहे. या देशातील बँका आता रुपया चलनातील पेमेंट स्वीकारतील. तसेच भारतातील आयातदारांनाही रुपयामध्येच पेमेंट करू शकतील. दोन्ही देशांतील आयात निर्यात आता अधिक सुलभ होईल.

कोणत्या देशांसोबत रुपयात व्यापार होईल (Which country adopt Vostro Accounts)

बोटस्वाना, फिजी, जर्मनी, गुयाना, इस्राईल, मलेशिया, केनिया, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, ओमान, रशिया, सेशल्स, सिंगापूर, श्रीलंका, टांझानिया, युगांडा आणि ब्रिटन या देशातील 30 बँकांनी भारतीय बँकासोबत मिळून वोस्ट्रो खाते सुरू केले आहे. त्यामुळे भारत आणि या 18 देशांसोबत व्यापार करताना रुपया चलन वापरता येईल. या खात्यांना "'Special Rupee Vostro Accounts" असे म्हटले जाते.

वोस्ट्रो खात्यातील व्यापार कसा चालणार? (How Vostro Account will work)

रूपयामध्ये व्यापार करताना दोन्ही देशांच्या चलनातील विनिमय दर विचारात घेतला जाईल. हा व्यापार करताना डॉलरचा दर किती आहे, याच्याशी काहीही संबंध येणार नाही. दोन्ही देशांतील चलनाच्या दरात जो काही फरक असेल, त्यानुसार आयात निर्यातीचा व्यापार चालेल. मात्र, ज्या बँकांना सरकारने परवानगी दिली आहे, त्या बँकांद्वारेच हे व्यवहार चालतील. भविष्यात आणखी काही बँकांचा समावेश यामध्ये होऊ शकतो.

भारताला काय फायदे होणार? (Benefit of Tread in Rupee)

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे मूल्य कायम घसरत आहे. रूपयामध्ये व्यापार सुरू झाल्यास अनेक देश भारतासोबत व्यापार करण्यात रूची दाखवतील. तसेच ज्या देशांवर आंतरराष्ट्रीय संस्थांनी आर्थिक निर्बंध घातले आहेत, त्या नियमांना बगल देऊन त्यांच्याशी रुपयात व्यापार करता येणार आहे. 

याचे ताजे उदाहरण म्हणजे, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी मिळून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे रशियासोबत डॉलरमध्ये व्यापार करण्यास भारताला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता या निर्बंधांना बाजूला सारून रुपयामध्ये भारताला थेट रशियाशी व्यापार करता येईल. मागील काही महिन्यांपासून भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल (कच्चे तेल) स्वस्तात आयात करत आहे. हा व्यापार आता भारताला रुपयात करता येणार आहे.