गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पेमेंट करण्यात भारतीयांनी मोठी आघाडी घेतलेली आहे. आता तर डिजिटल पेमेंट व्यवहार करण्यात भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. खरे तर भारतीय अर्थविश्वासाठी हि एक महत्वाची बातमी आहे. कधी काळी केवळ रोखीने व्यवहार करणारे भारतीय लोक आता डिजिटल पेमेंट ऑप्शनचा स्वीकार करायला लागले आहेत. 2016 साली केंद्र सरकारने 500 (जुन्या नोटा) आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या होत्या. त्यानंतर सातत्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यात भारतीय नागरिकांनी पसंती दिली आहे.
रेकॉर्ड ब्रेकिंग UPI व्यवहार
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतात 9.41 अब्ज UPI पेमेंट नोंदवले गेले आहेत. या सगळ्या पेमेंटची एकंदरीत किंमत 14.3 ट्रिलियन रुपये इतकी प्रचंड होती. गेल्या आर्थिक वर्षातील UPI व्यवहारांशी तुलना केली असता यावर्षी UPI व्यवहारांत सुमारे 58% वाढ झाली आहे. यावरून डिजिटल पेमेंट संदर्भात भारतीयांचा कल आपल्याला समजून येतो.
जागतिक स्तरावर भारत अव्वल
2022 या आर्थिक वर्षात भारतात 89.5 दशलक्ष डिजिटल व्यवहार नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणाऱ्या पहिल्या पाच देशांच्या यादीत भारताचा पहिला क्रमांक आहे.केंद्र सरकरच्या योजना आणि कामगिरीची माहिती देणाऱ्या MyGovIndia या पोर्टलने ही माहिती सार्वजनिक केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत होणारे हे बदल सकारात्मक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
? India keeps dominating the digital payment landscape! ??? With innovative solutions and widespread adoption, we're leading the way towards a cashless economy. ?#9YearsOfTechForGrowth #9YearsOfSeva@GoI_MeitY @AshwiniVaishnaw @Rajeev_GoI@alkesh12sharma @_DigitalIndia pic.twitter.com/cSfsFsq0mW
— MyGovIndia (@mygovindia) June 9, 2023
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तज्ञांच्या मते, डिजिटल पेमेंटमध्ये भारत नवनवीन सुधारणा करू बघत आहे. एकंदरीत होणारे डिजिटल पेमेंटचे मूल्य आणि एकंदरीत पेमेंटची वाढती संख्या या दोन्हीमध्ये सातत्याने होणारी वाढ ही च्नागली बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यानिमित्ताने भारताच्या पेमेंट इकोसिस्टमची ताकद आणि स्वीकृती देखील स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
रिअल-टाइम पेमेंटमध्ये भारताचा मोठा वाटा
MyGovIndia ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये जागतिक रिअल-टाइम पेमेंटमध्ये भारताचा वाटा 46 टक्के होता. भारताची लोकसंख्या, तंत्रज्ञानाचा, टेलिकम्युनिकेशनचा वाढता वापर आणि विस्तार यामुळे भारताने हा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. भारतातील डिजिटल पेमेंट व्यवहार इतर चार प्रमुख देशांच्या एकत्रित तुलनेत अधिक जास्त आहेत.
MyGovIndia डेटानुसार, 89.5 दशलक्ष डिजिटल व्यवहारांची नोंद करत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच या यादीत ब्राझील 29.2 दशलक्ष व्यवहारांसह दुस-या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर चीन 17.6 दशलक्ष व्यवहारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 16.5 दशलक्ष डिजिटल व्यवहारांसह थायलंड चौथ्या क्रमांकावर असून 8 दशलक्ष व्यवहारांसह दक्षिण कोरिया पाचव्या क्रमांकावर आहे.